शिवसेनेच्या ऑनलाईन मिटींगमध्ये जिल्ह्यातील नेते व पदाधिकारी सहभागी ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । शिवसेनेच्या ५४व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ऑनलाईन पध्दतीत शिववसैनिकांना संबोधित केले असून यात जिल्ह्यातून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

याबाबत वृत्त असे की, आज शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्हर्च्युअल सभेचे आयोजन केले. यात झूम अ‍ॅपच्या माध्यमातून राज्यभरातील नेते, पदाधिकारी आणि कार्यर्त्यांशी संवाद साधण्यात आला. जळगाव जिल्ह्यात यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यापक प्रमाणात नियोजन केले होते. त्यांनी जळगाव महानगरच्या पदाधिकार्‍यांसाठी अजिंठा विश्रामगृहात अद्ययावत व्हिडीओ कॉन्फरन्सींगची प्रणाली उभारली होती. यात महानगर आणि जळगाव तालुक्यातील पदाधिकारी सहभागी झाले. स्वत: पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पाचोरा येथे आ. किशोरआप्पा पाटील यांच्या कार्यालयाचे उदघाटन केल्यानंतर तेथूनच ते या सभेत सहभागी झाले. त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ व आ. किशोर पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी हे देखील सहभागी झाले होते. याशिवाय, जिल्हाप्रमुख आ. चंद्रकांत पाटील हे मुक्ताईनगरातून, आ. चिमणराव पाटील हे पारोळ्यातून तर आ. लताताई सोनवणे या जळगावातून या बैठकीत सहभागी झाल्या होत्या.

दरम्यान, आगामी काळात जिल्ह्यात शिवसेनेच्या कार्य प्रणालीचे डिजीटायझेशन करण्यात येणार असून सर्व पदाधिकर्‍यांची ऑनलाईन बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली आहे.

खालील व्हिडीओत पहा ऑनलाईन बैठकीत सहभागी पदाधिकारी.

https://www.facebook.com/508992935887325/videos/562867201255699/?__so__=channel_tab&__rv__=all_videos_card

Protected Content