खासदाराच्या पदवीच्या चौकशीसाठी जनहित याचिका

नवी  दिल्ली : वृत्तसंस्था / झारखंडमध्ये गोड्डाचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या एमबीए पदवीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय. जमशेदपूरचा रहिवासी असलेल्या एका व्यक्तीनं झारखंड उच्च न्यायालयात दुबे यांच्या पदवीच्या चौकशीची जनहित याचिका दाखल केली. भारताच्या निवडणूक आयोगानं निशिकांत दुबे यांचं लोकसभा सदस्यत्व तत्काळ रद्द करण्याचीही याचिकाकर्त्यांनी मागणी केलीय.

जमशेदपूरच्या दानिश नावाच्या व्यक्तीनं ही याचिका दाखल केली आहे . दुबे यांनी सादर केलेल्या एमबीएच्या पदवीची सीबीआय चौकशी करण्याची मागणी दानिश यांनी केलीय. सीबीआयला एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशीही मागणी दानिश यांनी केलीय.

दानिश यांच्या म्हणण्यानुसार, निशिकांत दुबे यांनी वर्ष २००९, वर्ष २०१४ आणि वर्ष २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या शपथपत्रात त्यांनी ‘दिल्ली विद्यापीठा’च्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून एमबीएची पदवी प्राप्त केल्याचं म्हटलंय. परंतु, काही दिवसांपूर्वी दिल्ली विद्यापीठानं एका आरटीआयला दिलेल्या उत्तरात मात्र निशिकांत दुबे नावाच्या कोणत्याही व्यक्तीनं कोणत्याही काळात मॅनेजमेंटची पदवी प्राप्त केलेली नाही असं म्हटल्याचा दावा दानिश यांनी याचिकेद्वारे केलाय.

Protected Content