चाळीसगाव प्रतिनिधी। शहरातील बंद मेडिकलचे दुकानाचे कुलूप फोडून दुकानातील ड्रावरमध्ये ठेवलेले रोकड व ५ हजार किंमतीचे सीसीटीव्ही कॅमेरे असे एकूण ८५ हजारांचे मुद्देमाल अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश वाल्मिक येवले (वय-४१ रा. भडगाव रोड ता. चाळीसगाव) हे वरील ठिकाणी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. येवले याचा मेडिकल हा व्यवसाय असल्याने श्री. समर्थ दवाखान्याच्या खाली श्री. समर्थ नावाची मेडिकल दुकान स्वतःच्या मालकीची आहे. येवले व मेडिकल मधील कामगार विशाल शिंदे दोघांनी गुरूवार, १० रोजी सकाळपासून रात्री ११ वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवली. नंतर येवले हे दुकानाला कुलूप लावून झोपण्यासाठी घरी निघून गेले. शुक्रवार, ११ रोजी पहाटे ३:३० वाजताच्या सुमारास मेडिकल कामगार विशाल शिंदे याला मेडिकल दुकानाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यावर त्यांनी लागलीच येवले यांना फोन करून घटनेबाबत माहिती दिली. त्यावर येवले हे दुकानाकडे धाव घेऊन मेडिकल मध्ये पाहणी केली असता दुकानातील ड्रावरमध्ये ठेवलेले ८०,००० हजार व ५,००० किंमतीचे सीसीटीव्ही कॅमेरे असे एकूण ८५,००० हजारांचा मुद्देमाल अज्ञात इसमाने चोरून नेल्याचे कळताच त्यांनी श्री. समर्थ दवाखान्यात सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या इंडिका कारमधून (क्र. एम.एच. ३० पी १७८९) उतरलेले व तोंडावर रूमाल बांधलेले तीन अनोळखी इसम आढळून आले. दरम्यान दुसरीकडे नवजीवन दवाखान्यातील मेडिकल तोडण्यात चोरट्यांना अपयश आले. याच कारच्या पाठलाग करून शहर पोलिसांनी नागदरोड वर कारला जप्त केले. परंतू अंधाराचे फायदा घेत चोरट्यांनी पळ काढला. योगेश येवले यांनी शहर पोलिस स्थानक गाठून भादवी कलम- ४५७, ३८० प्रमाणे अज्ञात तीन इसमाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि सचिन कापडणीस हे करीत आहेत.