शौर्याला सलाम! अमळनेकरांनी २०० फुटांच्या तिरंग्यासह काढली विजयी रॅली!


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय लष्कराच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी आणि राष्ट्रप्रेम जागृत ठेवण्यासाठी अमळनेर शहरातील समस्त राष्ट्रप्रेमी नागरिकांनी आज भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले.

सकाळी ८ वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून या शिस्तबद्ध यात्रेला सुरुवात झाली. यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांनी सुमारे २०० फूट लांबीचा भव्य तिरंगा ध्वज हातात धरला होता, तर अनेकांच्या हातात लहान-मोठे तिरंगे फडकत होते.

काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. जनतेच्या भावनांचा आदर करत भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानात घुसून ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केले. भारत देश एकसंध असून तो दहशतवाद कधीही खपवून घेणार नाही, हे भारतीय लष्कराने आपल्या कृतीतून दाखवून दिले. याच शौर्याला अभिवादन करण्यासाठी अमळनेरच्या राष्ट्रप्रेमी नागरिकांनी या भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते.

या रॅलीत डीजेच्या तालावर देशभक्तिपर गीते सादर करण्यात आली, ज्यामुळे वातावरण अधिक उत्साही बनले होते. या रॅलीत संसदरत्न खासदार स्मिताताई वाघ, मंगळग्रह सेवा संस्था, खानदेश शिक्षण मंडळ, लायन्स क्लब, रोटरी क्लब, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मराठा समाज महिला मंडळ, आयएमए संघटना, निमा संघटना, होमिओपॅथी असोसिएशन, मुंदडा फाऊंडेशन, प्रताप महाविद्यालय, श्रमसाफल्य एज्युकेशन सोसायटी, खानदेश रक्षक संघटना, व्यापारी संघटना, अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ, व्हॉइस ऑफ मीडिया, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि इतर सर्व राष्ट्रीय पक्षांचे कार्यकर्ते, मुस्लिम समाज बांधव, आजी-माजी सैनिक, व्यापारी बांधव आणि असंख्य राष्ट्रप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सदर रॅली पाच कंदील चौक, दगडी दरवाजा, पाच पावली, बस स्टँड, महाराणा प्रताप चौक, कचेरी रोडमार्गे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरापर्यंत पोहोचली. या ठिकाणी सर्वप्रथम खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर खासदार वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाचे आणि भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याचे कौतुक केले. याचा आम्हा सर्व भारतवासीयांना अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डीगंबर महाले यांनी केले, तर शेवटी आभार अमळनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी मानले.

दरम्यान, खासदार स्मिताताई वाघ यांना नुकताच संसद रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मंगळग्रह सेवा संस्थेच्या वतीने अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम आणि खजिनदार गिरीश कुलकर्णी यांनी त्यांचा विशेष सत्कार केला.