नवी दिल्ली-वृत्तसेवा । भारतीय कुस्तीला ऑलिम्पिक स्पर्धेत चमकावणाऱ्या महिला पैलवान साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. दोन्ही कुस्तीपटूंनी कुस्तीला रामराम ठोकण्याची घोषणा केली. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याच समर्थकाची नियुक्ती झाली आहे. संजय सिंह हे कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले आहेत. मात्र ज्या बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करत, तब्बल 40 दिवस दिल्लीत आंदोलन करुनही, त्यांच्याच माणसाची नियुक्ती महासंघाच्या अध्यक्षपदी विराजमान होत असेल, तर कुस्तीला रामराम ठोकलेला बरा, असं म्हणत साक्षी मलिक ढसाढसा रडली.
साक्षी मलिकने महिला कुस्ती स्पर्धेत भारताला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं होतं. साक्षीने 2016 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं होतं. तर विनेश फोगट ही सुद्धा पदक विजेती कुस्तीपटू आहे. विनेशने कॉमनवेल्थ आणि आशियाई स्पर्धा या दोन्ही स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं होतं. असा पराक्रम गाजवणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे.
विनेश फोगट म्हणाली, “संजय सिंह यांना आज कुस्ती महासंघाचे अध्यक्ष करण्यात आले. त्यांना अध्यक्ष केले म्हणजे खेळातील मुलींना पुन्हा बळी पडावे लागेल. आम्ही जी लढाई लढत होतो त्यात यश आलं नाही. देशात आम्हाला न्याय कसा मिळेल हे माहीत नाही. आज कुस्तीचे भवितव्य अंधारात आहे, हे अतिशय दुःखद आहे.
दरम्यान, कुस्तीपटूंच्या या लढाईत, भारतीय पैलवान बजरंग पुनियाही सुरुवातीपासून आहे. संजय सिंह यांच्या निवडीनंतर बजरंग पुनिया म्हणाला, आमचा लढा पूर्वी सरकारशी नव्हता आणि आजही नाही. त्याची शक्ती आणि त्यामागे कार्यरत यंत्रणा साऱ्या देशाने पाहिली. 20 मुली आल्या होत्या आणि त्यांनी त्यांची निवड केली. ही लढाई सर्वांनाच लढावी लागणार आहे. आम्ही कधी कुस्ती करू शकू असे वाटत नाही. आमच्यासाठी जातिवाद नाही, पण आम्ही जातिवाद पाळतो असे ते सांगत आहेत. आम्ही राजकारण करण्यासाठी नाही तर आमच्या बहिणी आणि मुलींसाठी लढण्यासाठी आलो आहोत.
भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष असलेले बृजभूषण सिंहांवर लैंगिक छळाचे आरोप आहेत. हे आरोप दुसरे तिसरे कोणी नाही तर खुद्द महिला कुस्तीपटूंनी केले आहेत. ऑलिम्पिक पदकविजेते कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक, ऑलिम्पियन विनेश फोगट यांच्यासह देशातील अनेक दिग्गज कुस्तीपटूंनी याच वर्षाच्या सुरुवातीला मोठं आंदोलन उभं केलं होतं. तब्बल 40 दिवस हे पैलवान दिल्लीत आंदोलन करत होते. त्यांनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोन करत त्यांच्या अटकेची मागणी केली होती. इतकंच नाही तर बृजभूषण शरण यांच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी केली होती. मात्र दिल्ली पोलिसांनी हे कलम लावण्यास मनाई केली होती.
मग दिल्ली पोलिसांनी 15 जून 2023 रोजी भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या विरोधात 1500 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. सहा महिला कुस्तीपटूंनी केलेल्या तक्रारीनंतर हे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.