जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील चाळीसगाव, तालुका आणि भडगाव तालुक्यांमध्ये अतिवृष्टीने मोठी हानी झाली आहे. यात तीन तालुक्यांमधील ३८ गावे बाधीत झाले असून प्रशासनातर्फे याच्या पंचनाम्यांचे काम सुरू असून मदतीने प्रस्ताव तातडीने तयार करण्यात येत आहेत. दरम्यान, अतिवृष्टीग्रस्तांना मुंबई येथील श्री सिध्दीविनायक गणपती मंदिर न्याय यांच्यातर्फे मदत मिळावी यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अर्जाद्वारे विनंती करून साकडे घातले आहे.
याबाबत वृत्त असे की, ३० आणि ३१ ऑगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे चाळीसगाव, पाचोरा आणि भडगाव तालुक्यांमधील एकूण ३८ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. यात चाळीसगाव शहरालाही फटका बसला आहे. पूराचा फटका बसलेल्या गावांमधील तीन जणांचा यात मृत्यू झाला असून १५५ लहान आणि ५०७ मोठी गुरे मृत्यूमुखी पडली आहेत. मुसळधाव पावसामुळे ६५८ घरे अंशत: तर ३८ घरे पूर्णत: क्षतीग्रस्त झालेली आहेत. तसेच यात ३०० घरांचे नुकसान झालेले आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनातर्फे नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून यावरून मदतीसाठीचे प्रस्ताव तयार करण्याला वेग आलेला आहे. चाळीसगाव तालुक्यात दोन ठिकाणी मदत छावणी उभारण्यात आलेली आहे. या सर्वांना शासनातर्फे मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. मात्र अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासतर्फे भांडे, कपडे, शेगड्या आदींसह जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात यावी अशी विनंती करणारे पत्र जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पाठविले आहे. या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी स्वत: पाठपुरावा करून मदत मिळवून देणार असल्याची ग्वाही दिली आहे.