जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एका विवाहितेने तिळ्या (तीन) नवजात मुलांना जन्म दिल्याची अत्यंत आनंददायी घटना नुकतीच घडली. ही सिझेरियन शस्त्रक्रिया यशस्वी ठरून, आई आणि तीनही मुले पूर्णतः सुरक्षित आहेत. वैद्यकीयदृष्ट्या आव्हानात्मक असलेल्या या घटनेतून महाविद्यालयाच्या उत्कृष्ट वैद्यकीय सेवांचा प्रत्यय आला असून, अधिष्ठातांकडून संपूर्ण वैद्यकीय पथकाचे कौतुक करण्यात आले आहे.
सपना राठोड (वय २५) यांना प्रसूतीसाठी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात दाखल करण्यात आले होते. तपासणीत त्यांच्या गर्भात तीन बाळ असल्याचे निदान झाले. त्यामुळे प्रसूतीची प्रक्रिया अधिक दक्षतेने हाताळण्याची आवश्यकता होती. वैद्यकीय पथकाने अत्यंत काळजीपूर्वक नियोजन करून सिझेरियन शस्त्रक्रिया पार पाडली आणि महिलेनं तीन गोंडस मुलांना जन्म दिला.

या यशस्वी शस्त्रक्रियेमध्ये डॉ. राहुल कातकाडे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. सुरज कोठावदे, डॉ. श्रद्धा चौधरी, डॉ. माधुरी उदगिरे, डॉ. चंद्रकांत बर्गे, डॉ. श्रेष्ठा शुक्ला, डॉ. श्रीहरी बिरादार, डॉ. मिताली इंगळे यांच्यासह बधिरीकरण शास्त्र विभागाचे डॉ. अमित हिवरकर, डॉ. अंजू पॉल, डॉ. ऐश्वर्या मोने, डॉ. तासीन सीदा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संपूर्ण वैद्यकीय पथकाने समन्वय साधून ही अत्यंत संवेदनशील शस्त्रक्रिया यशस्वी केली.
तीन्ही नवजात बाळांचे वजन अनुक्रमे १.६ किलो, १.९ किलो आणि २.० किलो असून सर्व मुले ठणठणीत व निरोगी आहेत. त्या सध्या नवजात अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या सतत निरीक्षणाखाली आहेत. “ही शस्त्रक्रिया आमच्या टीमच्या अनुभव, समर्पण आणि समन्वयाचे फळ आहे. आई व मुले सुरक्षित असणे हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे,” असे डॉ. राहुल कातकाडे यांनी सांगितले.
ही घटना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय कौशल्याचे आणि सेवाभावाचे जणू प्रतीकच ठरली आहे. महिला व तिचे कुटुंबीय या त्रैतीय जन्मामुळे अत्यंत आनंदित आहेत. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील, अधिसेविका संगीता शिंदे यांच्यासह सर्व वैद्यकीय पथकाने या यशाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.



