जळगाव प्रतिनिधी । कपडे धुण्याच्या कारणावरुन एकाला मारहाण झाल्याची घटना एरंडोल तालुक्यातील नागदुली येथे 19 ऑगस्ट 2017 रोजी घडली होती. जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मोरे यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात दाखल सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात आरोपी रशीद कबीर शेख व रफिक उर्फ इकबाल रशीद शेख या दोघांना 8 वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर.जे.कटारिया यांनी हा निकाल दिला.
नागदुली येथे अनिल मोरे (रा.नागदुली, ता.एरंडोल) यांची मुलगी धुणे धुत असताना रशीद व रफिक या दोघांनी मोरे यांच्या मुलीस धुणं धुण्यास मनाई केली. त्यावर मोरे यांनी गावातील सर्व महिला येथे धुणे धुतात मग, माझ्याच मुलीला विरोध का असे म्हटले असता दोघांनी अनिल मोरे यांना लाकडी दांडा व लाथाबुक्यांनी डोक्याला, पोटावर व पायावर जबर मारहाण करुन जीव ठार मारण्याची धमकी दिली होती. या घटनेत डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी दोघं आरोपींविरुध्द एरंडोल पोलीस स्टेशनला खून व अट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला होता.
तपासाधिकाजयांनी या गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर.जे.कटारिया यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात 15 जणांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या. पुरावा, सरकारी वकील चारुलता राजेंद्र बोरसे यांचा प्रभावी युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने दोघांना कलम 304 भाग 2 व 323 सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी धरुन 8 वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे अॅड.चारुलता बोरे यांनी कामकाज पाहिले. केसवॉज बैसाने व पैरवी अधिकारी सहायक फौजदार शालीग्राम पाटील यांनी मोलाची मदत केली.