अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सचिन तेंडुलकरने आपला भारतरत्न पुरस्कार परत करावा किंवा त्यांनी ऑनलाईन रमीची जाहीरात सोडावी. तसे न केल्यास सचिनच्या मुंबईतील घराबाहेर मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. सचिन तेंडुलकरचा सुरक्षारक्षक प्रकाश कापडे याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. ही आत्महत्या ऑनलाईन रमीच्या व्यसनामुळे झाल्याचा दावा कडू यांनी केला आहे.
सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाने आत्महत्या करणे हे खेदजनक आहे. त्याने केलेली आत्महत्या ही ऑनलाईन रमीच्या व्यसनामुळे केली आहे असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. या व्यसनामुळे जर त्याने ही आत्महत्या केली असेल तर ते खेदजनक असल्याचेही कडू म्हणाले. एखादी व्यक्ती तुमचा जीव वाचवण्यासाठी तैनात असेल. त्याचाच जीव जर तुमच्या जाहीराती मुळे जाणार असेल तर ती जबाबदारी सचिन तेंडुलकरांनी स्विकारली पाहीजे असेही कडू म्हणाले. सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न म्हणून सर्वांनी स्विकाले आहे. पण या जाहीरातीमुळे ते वादात अडकले आहे. अशा स्थितीत त्यांनी भारतरत्न पुरस्कार परत केला पाहीजे. नाही तर ती जाहीरात तरी सोडली पाहीजे. एक तर भारतरत्न परत करा किंवा जाहीरात सोडा. तसे केले नाही तर सचिन तेंडुलकर यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. शिवराज्यभिषेकाच्या दिवशी म्हणजेच 6 जूनला हे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्या दिवशी शक्य न झाल्यास 7 जूनला आंदोलन करून त्यांचा पुतळा जाळू असेही ते म्हणाले.
प्रकाश कापडे हे गेल्या १५ वर्षांपासून राज्य राखीव पोलीस दलाच्या सेवेत काम करत होते. त्यांनी या आधी छगन भुजबळ, नारायण राणे यांचे अंगरक्षक म्हणून काम केले आहे. सध्या ते सचिन तेंडुलकरचे अंगरक्षक म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी जामनेर इथल्या निवासस्थानी त्यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्या घटनेनंतर सर्वच जण हादरून गेले होते. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे. नक्की त्यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अजूनही समजू शकलेले नाही. मात्र कडू यांच्या दाव्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची दाट शक्यता आहे.