मुंबई प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे सावरकर भाजपला मान्य आहेत का, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
सचिन सावंत म्हणाले की, मध्य प्रदेशमधील सेवादलाच्या एका घटकाने मर्यादित स्वरुपात वाटप केलेल्या माहिती पुस्तिकेतील काही मजकुराचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस निश्चितच समर्थन करत नाही. काँग्रेस पक्षाचा सावरकरांच्या विचारांना असलेला विरोध हा वैचारिक असून तो व्यक्तिद्वेषातून खचितच नाही. सावरकरांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची माहिती ही अप्रस्तुत आहे. कोणाचे व्यक्तिगत आयुष्य हे राजकीय चर्चेचा भाग कदापि असू नये, हीच काँग्रेस पक्षाची धारणा आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा सावरकर व गोळवलकर यांनी केलेला अवमान काँग्रेस पक्ष कधीही विसरणार नाही, असेही ते म्हणाले. महाराजांचा अवमान करणारे सावरकर हे भाजपला मान्य आहेत का ? असा प्रश्न करत तसेच सावरकरांबद्दल भाजपला आलेला कळवळा ही महाराष्ट्रात भाजपविरहित सरकार स्थापन झाल्याचा पोटशूळ असून त्यांचे सावरकर प्रेम हे राजकीय कावेबाजी असल्याचा टोला सावंत यांनी मारला आहे.