सचिन पायलट समर्थकांचा व्हिडीओ; आज काँग्रेसची पुन्हा बैठक

नवी दिल्ली । सचिन पायलट यांच्या समर्थकांनी आज नवीन व्हिडीओ जारी केला असून यामध्ये ते वगळता अन्य १५ आमदार उपस्थित असल्याचे दिसून येत आहे. यामुळे गेहलोत सरकारकडे नेमक्या किती आमदारांचे समर्थन आहे याबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी १०० आमदारांसह शक्तीप्रदर्शन केलं. यामुळे त्यांचे सरकार सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर सचिन पायलट यांच्या सहकार्‍यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून यामध्ये १५ आमदार त्यांच्यासोबत बसले असल्याचं दिसत आहेत. सचिन पायलट यांनी याआधी आपल्याकडे ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं होतं. मात्र आता या व्हिडीओत पायलट यांच्यासह इतर १५ सदस्य दिसत आहेत. हा व्हिडीओ सचिन पायलट यांच्या ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकण्यात आला. या व्हिडीओत सचिन पायलट दिसत नसले तरी १६ आमदार एकत्र बसल्याचं दिसत आहे. व्हिडीओत अन्य ६ लोकही असले तरी त्यांची ओळख पटली नाही. या व्हिडीओत आमदार इंद्रराज गुर्जर, मुकेश भाकर, हरीश मीणा दिसत आहेत. हा व्हिडीओ ट्विट करत पर्यटन मंत्री विश्‍वेंद्र सिंह यांनी फॅमिली असा उल्लेख केला आहे.

यामुळे पायलट व गेहलोत यांच्यासोबत नेमके किती सदस्य आहेत याबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे पायलट आणि गेहलोत यांच्यात समेट घडवण्याचे प्रयत्न सुरुच असून काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची मंगळवारीदेखील बैठक होणार आहे.

Protected Content