भुसावळ प्रतिनिधी । भुसावळकर सध्या अनेक समस्यांनी हैराण झाला असून यासाठी नगरपालिकेतील सत्ताधारी भाजप कारणीभूत असल्याचा आरोप बाजार समिती सभापती सचिन चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी यांनी पत्रकार परिषदेत नगरपालिकेतील सत्ताधार्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, शहरातील गढूळ पाणीपुरवठ्यामुळे कॉलरा, कावीळ, विषमज्वर गॅस्ट्रो अश्या रोगांचा फैलाव होण्याची शक्यता असल्याचा अहवाल, आरोग्य सेवा उपसंचालकांनी दिला आहे. पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणारे अॅलम निकृष्ट असल्याचा आरोप त्यांनी केला. भुसावळकरांच्या या विविध समस्यांबाबत जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना निवेदन दिले असल्याची माहिती सुध्दा त्यांनी याप्रसंगी दिली.
भुसावळ शहरातील गढूळ पाणीपुरवठा, अमृत योजनेच्या कामामुळे रस्त्यांंची होणारी दूरवस्था यामुळे नागरिकांचा त्रास वाढला आहे. अमृत योजनेत अनेक गैरप्रकार होत असून, त्यात पालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवक सहभागी आहेत. त्यामुळे सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा सचिन चौधरी यांनी दिला. तर शहरातील स्मशानभूमी आणि कब्रस्तानमध्ये पालिकेचा कर्मचारी यापुर्वी नियुक्त होता. मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी पालिकेकडून सरपण दिले जात होते. मात्र आता तेही बंद झाले असून पालिकेचा कर्मचारी मृत्यूची नोंद घेण्यासाठी हजर नसतो. त्यामुळे पालिकेने कर्मचार्यांची नियुक्ती करावी, अशी मागणीदेखील सचिन चौधरी यांनी केली.