अबुधाबी (वृत्तसंस्था) गोव्यातील सबिता यादव हिने विशेष ऑलिम्पिक जागतिक स्पर्धेत टेबल टेनिस प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. इतकेच नाही, तर तिने दुहेरीत रौप्य पदक जिंकत देशाला दोन पदके मिळवून देण्याचा पराक्रम केला आहे.
सबिताला बौद्धिक अपंगत्वाबरोबरच व्यवस्थित बोलताही येत नाही. सबिताच्या वडिलांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. तिची आई घरकाम करते. झाडू मारणे, तसेच साफसफाईची कामे करून यादव कुटुंबाचा चरितार्थ चालतो. आर्थिकदृष्ट्या दुबळ्या असलेल्या आपल्या कुटुंबासाठी सबिताला काहीतरी करून दाखवायचे आहे. सबिताने एका विशेष विद्यालयात प्रवेश मिळवला आहे. इथे तिला व्यायसायिक प्रक्षिक्षण दिले जाते. तिथे मुलांना शिवणकाम आणि पाककलेबरोबर इतरही अनेक गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते. मात्र, तिची रुची टेबल टेनिसमध्ये आहे. प्रचंड परिश्रम आणि सातत्यामुळे सबिताचे स्वप्न पूर्ण झाले, अशी प्रतिक्रिया टेबल टेनिस प्रशिक्षक शीतल नेगी यांनी व्यक्त केली आहे.