मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अंधेरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा रमेश लटके यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी येथील विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या जागेवरून त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे तिकिट जाहीर करण्यात आले आहे. तथापि, त्यांचा राजीनामा हा मुंबई महापालिकेने अद्याप स्वीकारला नसल्याने पेच निर्माण झाला होता. या प्रकरणी त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.
दरम्यान, आज यावर मुंबई उच्च न्यायालात सुनावणी झाली. ऋतुजा लटके आणि मुंबई महापालिका अशा दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर हायकोर्टानं दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास आपला निकाल दिला. हायकोर्टानं थेट मुंबई महापालिकेला आदेश दिला की, उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत लटके यांना राजीनामा स्विकारल्याचं पत्र द्या. या परिस्थितीत आम्हाला हस्तेक्षेप करावा लागत आहे, अशी टिप्पणीही यावेळी हायकोर्टानं निर्णय देताना केली. यामुळे ऋतुजा लटके यांचा मार्ग मोकळा झाला असून उध्दव ठाकरे यांना देखील दिलासा मिळाला आहे.