वाळूमाफियांची मुजोरी : तहसील कार्यालयातून जप्त केले वाहन चोरले !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे डंपर यावल महसूल विभागाने जप्त करून तहसील कार्यालयात पार्किंगला लावले होते. हे वाहन तहसील कार्यालयातून चोरून नेण्याचे उघडकीला आले आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल महसूल विभागाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, यावल शहरातून बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक करणारे डंपर क्रमांक (एमएच १९ सीवाय ८६५६) याच्यावर कारवाई करून यावल महसूल पथकाने डंपर जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात लावले होते. गुरुवार १३ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ ते सकाळी ६ वाजेच्या दरम्यान गणेश गंगाराम केळी (वय-२३) रा. ममुराबाद ता. जळगाव, संदीप आधार सोळंके रा. कोळन्हावी ता. यावल यांच्यासह इतर दोन जण यांनी यावल तहसील कार्यालयाचे बंद गेट तोडून अनधिकृतपणे प्रवेश करून ६ लाख २ हजार रुपये किमतीचे वाळूचे डंपर चोरून नेल्याचे समोर आले आहे. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक अधिकारी दीपक बाविस्कर यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गणेश गंगाराम केळी (वय-२३) रा. ममुराबाद ता. जळगाव, संदीप आधार सोळंके रा. कोळन्हावी ता. यावल यांच्यासह इतर दोन जणावर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर करीत आहे.

Protected Content