मुंबई प्रतिनिधी | राज्य सरकारने घटस्थापनेपासून सर्वधर्मीय देवस्थाने खुली करण्याचा निर्णय घेतला असून रात्री उशीरा याबाबतची नियमावली देखील जाहीर केली आहे.
कोरोना आटोक्यात येत असल्याने राज्य सरकारने काल दोन महत्वाचे निर्णय घेतले. यात राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले. तसेच राज्यातील सर्व देवस्थाने हे भाविकांसाठी घटस्थापनेचा दिवस म्हणजे ७ ऑक्टोबर पासून खुली करण्यात येणार असल्याचा निर्णय देखील जाहीर करण्यात आला. यानंतर रात्री राज्य सरकारने देवस्थानांमध्ये दर्शन घेण्याची नियमावली जाहीर केली आहे. हे नियम दर्शन घेणारे भाविक आणि देवस्थानांचे विश्वस्त मंडळ यांनी पाळायचे असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे.
राज्य सरकारने जारी केलेले नियम हे खालीलप्रमाणे आहेत.
* ज्यांना कोरोनाची लक्षणं नाहीत, फक्त त्यांनाच धार्मिक स्थळांच्या परिसरात प्रवेश मिळणार आहे. यासाठी धार्मीक स्थळांची देखरेख करणारे वा विश्वस्त मंडळाने प्रवेश द्वारावरच थर्मल स्क्रीनिंग आणि सॅनिटायझरची व्यवस्था करणे आवश्यक राहणार आहे.
* कोविडचे सावट पूर्णपणे गेले नसल्यामुळे ज्यांनी मास्क घातलेला आहे किंवा तोंड झाकलेलं आहे त्यांनाच प्रवेश मिळेल. तर मास्क नसलेल्यांना देवस्थानात प्रवेश मिळणार नाही. लोकांनी प्रवेश करण्यापूर्वी साबणाने हात धुवावीत, सॅनिटायजरचा उपयोग करावा हे बंधनकारक करण्यात आले आहे.
* येणार्या जाणार्यांमध्ये सामाजिक अंतर ठेवण्यासाठी योग्य प्रकारे मार्कींगची व्यवस्था करणे बंधनकारक करण्यात आले आहे. धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश करताना दोघात कमीत कमी ६ फुटाचं अंतर असावे असा नियम लावण्यात आला आहे. याची अंमलबजावणी होते की नाही यावर देखरेख करण्याची जबाबदारी विश्वस्त मंडळाची राहणार आहे.
* एखाद्या मंदिरात, धार्मिक स्थळात एकाच वेळी किती जणांना प्रवेश द्यायचा ते ट्रस्टनं ठरवायचं आहे. व्हेंटिलेशन, उपलब्ध जागा या सर्व गोष्टी लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवून याबाबतचा निर्णय घ्यावा असे यात सूचित करण्यात आलेले आहे.
* देवस्थानांच्या विश्वस्त मंडळांनी कोविड रोखण्यासाठी सुचना देणारे फलक लावणं अनिवार्य, तसच ऑडिओ व्हिडीओही सर्वांना दिसेल अशा प्रकारे लावण्याची गरज आहे.
* धार्मिक स्थळांमध्ये आत आणि बाहेर पडण्याचे वेगवेगळे मार्ग असावेत असे या नियमावलीत स्पष्ट केलेले आहे.
* धार्मिक स्थळांमध्ये प्रसाद वाटणे, तुषार शिंपडणे अशा गोष्टी पूर्णपणे बंद असतील. तसेच भक्तांना मुर्ती, धार्मिक ग्रंथ, पुतळे यांना हात लावता येणार नाही.
* धार्मिक स्थळांमध्ये बसताना सोशल डिस्टन्सिंग पाळला जावं. परिसरात जास्तीत जास्त मोकळी हवा राहील याची काळजी घ्यावी. एअर कंडिशन २४ ते ३० अंश सेल्सियस एवढं ठेवावे, असा नियम देखील लागू करण्यात आलेला आहे.
* सर्वात महत्वाचे म्हणजे देवस्थानांमध्ये भजन, किर्तन किंवा इतर धार्मिक गायन पूर्णपणे बंद असेल. पण ऑडिओ सिस्टीमवर धार्मिक गीतं वाजवता येतील. प्रार्थनेसाठी मंदिरातील चटई ऐवजी भक्तांनी त्यांची स्वत:ची चटई किंवा तत्सम कापड सोबत घेऊन यावेत असेही सुचविण्यात आलेले आहे.
* धार्मिक स्थळाच्या परिसरातली दुकाने, स्टॉल्स, उपहारगृहे आदींनी फिजीकल डिस्टन्सींगसह कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याची गरज आहे. तर, प्रत्येक भाविकाने आपापल्या बुटा-चपलांची काळजी स्वत:च घ्यावयाची आहे.
* धार्मिक स्थळांवर गर्दी होणारा कोणताही कार्यक्रम करण्यात पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे.