तीन प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामासाठी १७ कोटी ६७ लक्ष निधी : पालकमंत्र्यांचे प्रयत्न

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीच्या व कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी प्रत्येकी ५ कोटी ८९ लक्ष म्हणजे एकूण १७ कोटी ६७ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील साळवा , जामनेर तालुक्यातील बेटावद व अमळनेर तालुक्यातील मारवड या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतींची व कर्मचारी निवासस्थान बांधकाम जीर्ण झाले होते याची दोन्ही मंत्रीद्वयानी दखल घेऊन शासनाकडे बांधकाम मंजुरीसाठी पाठपुरावा केला होता.

जिल्ह्यातील जनतेला आरोग्याच्या सोयी जलदगतीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे सतत प्रयत्नशील आहेतच. प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे केंद्रीय आरोग्य मंत्री भारतीताई पवार व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील साळवा, बेटावद व मारवड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती बांधकामासाठी प्रत्येकी ५ कोटी ८९ लक्ष या प्रमाणे एकूण १७ कोटी ६७ लक्ष इतका निधी मंजूर केला आहे.

याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री भारतीताई पवार व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून आभार मानले आहे. उपरोक्त नवीन उपकेंद्राची कामे ऍक्शन प्लॅननुसार मार्गी लावावी अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधितांना दिल्या आहेत. आगामी काळात लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Protected Content