खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ‘रोटरी क्लब ऑफ खामगाव’च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘तारे जमीन पर’ हा प्रकल्प आजपासून राबविण्यात येत आहे.
अंतराळ हा सगळ्यांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. विशेषतः: चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणानंतर तर संपूर्ण देशात अंतरीक्षाविषयी लोकांचे कौतुहल वाढलेले आहे. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी देखील बाल्यावस्थेत माता कौसल्येजवळ चंद्राचा बालहट्ट केला होता. निवांत रात्रीच्या वेळेस आपण जर आकाशाचे निरीक्षण केले तर आपणांस देखील ना ना प्रश्न डोक्यात येतात पण त्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी आपल्याकडे पुरेशी साधने नसतात आणि ती कुतुहलं तशीच मनातच दबून राहतात. हेच लक्षात ठेऊन पोलाद स्टील (जालना) यांनी अंतरिक्षाला समर्पित एका चालत्या फिरत्या बसरूपी प्रयोगशाळेची निर्मिती केलेली आहे.
या बसमध्ये एक बलून असून त्यात साधारणपणे २५ ते ३० विद्यार्थ्याची बसण्याची सोय केलेली आहे. या बलूनची उंची ९ फूट असून व्यास १३ फूट आहे. बलूनमध्ये बसून आपण साधारणपणे २५ मिनिटे चालणा-या शोद्वारे ३६० डिग्री ३-डी प्रोजेक्टर स्क्रीनद्वारे अंतरिक्षाची सहल करू शकतो, त्याचे रहस्य जाणून घेऊ शकतो, आजवर न कळालेल्या अनेक गोष्टींची कुतूहलता शमवून घेऊ शकतो, प्रश्न विचारु शकतो, सफरीचा परिपूर्ण आनंद घेऊ शकतो.
या विशेष बसबद्दल माहिती कळाल्यावर आपल्या शहरातील विद्यार्थ्याना याचा लाभ व्हावा म्हणून रो राहुल खंडेलवाल यांनी पोलाद स्टील (जालना) यांचेशी संपर्क साधला व सदर बस खामगांव शहरात आणण्याविषयी सतत पाठपुरावा केला. त्यांच्या व्यक्तिगत स्तरावरील प्रयत्नांना अखेर यश आले आणि त्यांनी ही बस एका आठवड्यासाठी शहराला देण्यास मान्यता दिली.
आता ही अंतरिक्ष सहलीची बस खामगांव शहरातील शालेय विद्यार्थ्यांनसाठी दिनांक सोमवार दिनांक २४ जुलै ते रविवार दिनांक ३० जुलै २०२३ या दरम्यान उपलब्ध झालेली आहे. सदर अभिनव प्रकल्पासाठी ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ञ सुजीत भडंग यांची प्रकल्पप्रमुख तर सुप्रसिद्ध उद्योगपती यश गणात्रा यांचे सह-प्रकल्पप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.