केंद्र सरकार विरोधातील भूमिका भोवली : किरण मानेंची मालिकेतून हकालपट्टी

मुंबई प्रतिनिधी | केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली म्हणून स्टार प्रवाह वाहिनीवरील ख्यातनाम मालिका मुलगी झाली हो यातील अभिनेते किरण माने यांची हकालपट्टी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या अतिशय लोकप्रिय असणार्‍या मालिकेमध्ये अभिनेते किरण माने यांची प्रमुख भूमिका आहे. त्यांनी साकारलेलं विलास पाटील हे पात्र रसिकांच्या पसंतीस उतरले आहे. मात्र आता सोशल मीडियात ते मांडत असलेल्या विचारांमुळे माने यांना मुलगी झाली हो या मालिकेतून बाहेर काढण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

किरण माने हे सोशल मीडियात खूप सक्रीय आहेत. यात अलीकडच्या काळात ते केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका मांडत आहेत. याचीच त्यांनी जबर किंमत मोजावी लागली असून त्यांना मुलगी झाली हो या मालिकेतून बाहेर काढण्यात आले आहे. त्यांनी स्वत:  गुरुवारी सायंकाळी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. कॉंट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा गाड दो बीज हूँ मैं, पेड बन ही जाऊंगा!, असा मजकूर या पोस्टमध्ये आहे. आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला तरी आपण पुन्हा नव्याने उभारी घेऊ असे संकेत किरण मानेंनी आपल्या पोस्टमधून दिलेत. किरण मानेंनी त्यांच्यावर झालेल्या कारवाईच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

तर किरण माने यांच्या भूमिकेला सोशल मीडियातून समर्थन मिळाल्याचे दिसून येत आहे. कुणाला विचार पटत नसतील तर याची खुन्नस या प्रकारे काढणे गैर असल्याचा आरोप अनेक युजर्सनी केला आहे. हा एक प्रकारचा सांस्कृतीक दहशतवाद असल्याचा आरोप देखील अनेकांनी करत माने यांना पाठींबा दर्शविला आहे.

Protected Content