मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा मैदानात उतरला, तर तो इतिहास रचू शकतो. विराट कोहली आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसुद्धा जे करू शकले नाहीत, तो विक्रम रोहितच्या झोळीत पडण्याची दाट शक्यता आहे. पहिल्या सामन्यात अपयशाचा सामना करत भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला असतानाच, रोहितच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पहिल्या वनडे सामन्यात भारताने पावसामुळे कमी झालेल्या २६ षटकांच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत १३६ धावा केल्या. मात्र, ऑस्ट्रेलियाने केवळ २२ व्या षटकातच हे आव्हान पार करत सामन्यावर आपले वर्चस्व गाजवले. रोहित शर्माकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तो केवळ ८ धावांवर माघारी परतला. एक चौकार खेचून त्याने प्रयत्न केला असला, तरी मोठा खेळ साकारता आला नाही. यामुळे आता सर्वांच्या नजरा दुसऱ्या सामन्यावर खिळल्या आहेत.

IPL स्पर्धेनंतर मैदानात परतलेला रोहित शर्मा फिटनेसच्या बाबतीतही कमालीचा बदललेला दिसतो आहे. त्याने सुमारे १० ते १५ किलो वजन कमी केले असून, मैदानात तो नव्या आत्मविश्वासाने उतरतो आहे. वनडे संघाचे नेतृत्व सोडल्यानंतर रोहितमध्ये नवचैतन्य पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यात त्याला अपेक्षित फलंदाजी करता आली नाही, पण दुसऱ्या सामन्यात त्याच्यासमोर विक्रम रचण्याची सुवर्णसंधी आहे.
ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळताना रोहित शर्माने आजवर २० वनडे सामन्यांत ९९८ धावा केल्या आहेत. दुसऱ्या सामन्यात केवळ दोन धावा केल्या, तरी तो ऑस्ट्रेलियात १००० धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरेल. विशेष म्हणजे, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, एमएस धोनी यांसारख्या दिग्गज फलंदाजांनाही हा पराक्रम करता आला नाही. त्यामुळे रोहित जर या सामन्यात केवळ २ धावाही करत मैदानात टिकला, तर तो इतिहासात आपले नाव कोरू शकतो.
ऑस्ट्रेलियात खेळताना रोहितची फलंदाजी लक्षणीय राहिली आहे. त्याच्या खेळींमध्ये सातत्य असून, त्या खेळींनी भारताला अनेकदा विजयी केले आहे. त्यामुळे दुसऱ्या वनडेत तो केवळ वैयक्तिक विक्रमापुरता मर्यादित न राहता संघासाठी निर्णायक ठरणारी खेळी करेल, अशी अपेक्षा आहे.



