बुलढाणा प्रतिनिधी । कोरोनाचा कठीण काळ असला तरीही देशांतर्गत कोणतीही विकासकामे बंद नाहीत. नांदुरा-जळगाव-जामोद रस्त्यांवरील आरओबी निर्मिती कारण करण्याबाबतच्या कामांना गती देण्याचे आणि कामे लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याच्या सूचना देवून खासदार रक्षाताई खडसे यांनी महामार्ग प्राधिकरण अधिकारी व रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
नांदुरा-जळगाव-जामोद रस्त्यांवर वाढत्या ट्राफीकच्या समस्येने आणि सुरु असलेल्या रस्त्यांचा कामांमुळे जनसामान्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे या मार्गावरील कामांना जलद गती देण्यात यावी अशी भागातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी मागणी आहे. त्याअनुषंगाने आज खासदार रक्षाताई खडसे यांनी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकारी व रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक ठेवून सुस्तावल्या अवस्थेत सुरु असलेल्या कामांबाबत आढावा घेतला.
जनसामान्यांना चांगले रस्ते लवकरात लवकर उपलब्ध होण्याची प्रदीर्घ प्रतीक्षा आहे. त्यामुळे सुरु झालेले काम कासव गतीने होऊ लागताच जागृत नागरिक व शेतकरी हे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कामे लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशीलपणे कृतिशीलता दर्शवित असतात. आज नांदुरा-जळगाव-जामोद रस्त्याला प्रत्यक्ष भेट देऊन नांदुरा गेट क्रमांक १६ बाबत महामार्ग व रेल्वे अधिकाऱ्यांशी खासदारांनी चर्चा केली. तसेच नांदुरा-जळगाव-जामोद रस्त्यांवरील आरओबीसह डिजिटल माहिती फलक, सिक्युरिटी कॅमेरा, बसण्यासाठी पत्र्याचे शेड, शौचालय, सुरक्षा भिंत तसेच शेतीसाठी अंडर पास रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा आढावा खासदार रक्षाताई खडसे यांनी घेतला. गेट क्रमांक १९ महार्गाच्या कामकाजामुळे बंद झाल्यामुळे पर्यायी रस्ता नागरिकांना उपलब्ध करून देण्याबाबत रेल्वेसह महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. यावेळी सेंट्रल रेल्वेचे सिनिअर डी.एन.इस्ट अधिकारी किशोर सिंग यांच्यासह महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.