
शहादा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यात पाच अज्ञात दरोडेखोरांनी ज्वेलर्स व्यवसायिकाच्या कारला अडवून बंदुकीच्या धाकावर दरोडा आणि अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सुमारे ₹६० लाखांचा मौल्यवान सोने-चांदीचा ऐवज आणि रोख रक्कम लुटण्यात आली असून व्यापाऱ्याला मारहाण करून जखमी करण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण व्यापारवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रितेश जयप्रकाश पारेख (वय ३८, रा. सोनार गली, मेन रोड, शहादा) हे आपल्या म्हसावद येथील ज्वेलर्स दुकानाकडे मंगळवारी सकाळी कार (GJ 19 BE 7935) घेऊन जात होते. बुडीगव्हाण-म्हसावद रस्त्यावर त्यांच्या कारला पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर (MP 48 C 1837) कारने अडवले. किरकोळ धडक दिल्यानंतर त्या कारमधून उतरलेल्या पाच अज्ञात व्यक्तींनी व्यापाऱ्याशी वाद घातला. काही क्षणातच त्यांनी बंदुकीचा आणि चाकूचा धाक दाखवून व्यापाऱ्याला जबरदस्तीने त्यांच्या कारमध्ये बसवले.
यानंतर आरोपींनी व्यापाऱ्याकडील अंदाजे ३० किलो चांदीचे दागिने (किंमत ₹३० लाख), २०० ग्रॅम सोने (किंमत ₹२४ लाख) आणि रोख रक्कम असा एकूण ६० लाख रुपयांचा माल लुटला. दरोड्यादरम्यान व्यापाऱ्याला डोक्यावर मारहाण करून जखमी केले गेले. नंतर आरोपींनी व्यापाऱ्याला त्याच्या कारसह धुळे जिल्ह्यातील नवलनगर भागात सोडले आणि स्वतः नोंदणी नसलेल्या मोटारसायकलींवरून पसार झाले.
घटनेनंतर व्यापाऱ्याला वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५८१/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता २०२३ च्या कलम ३१०(२), ३१०(४), ३११, १३८, ३५१, ११५(२) तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ३(२५) आणि ४(२५) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले असून, पोलिसांनी शेजारील जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक पोलिसांना वायरलेस संदेशाद्वारे सतर्क केले आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून, ही घटना पूर्वनियोजित असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात कोणत्याही अंतर्गत व्यक्तीचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे. घटनेमुळे शहादा आणि म्हसावद परिसरातील ज्वेलर्स तसेच व्यापारी वर्गामध्ये तीव्र चिंता आणि घबराट निर्माण झाली आहे.



