जळगावात प्लास्टिक वेस्टपासून रस्ते तयार करावे : इनरव्हील क्लब न्यू जेनचे निवेदन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरात नव्याने रस्ते तयार करण्यात येत आहे. शहरातील रस्त्यांचे काम गुणवत्तापूर्ण व्हावे यासाठी थर्ड पार्टी ऑडिट करावे, मनपा प्रशासनाने आवश्यक ती दुरुस्ती अगोदरच करावी, जळगावातील रस्ते तयार करताना प्लास्टिक वेस्ट मटेरियलपासून तयार करावे, अशी मागणी इनरव्हील क्लब न्यू जेन तर्फे करण्यात आली.

इनरव्हील क्लब न्यू जेनतर्फे याबाबत महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देण्यात आले. प्रसंगी इनरव्हीलच्या अध्यक्षा नेहा संघवी, सचिव इशिता दोषी, माजी अध्यक्षा सकीना लेहरी, कल्पक सांखला, चेतन वाणी, वसीम खान आदी उपस्थित होते.

इनरव्हील क्लबतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात, शहरातील रस्त्यांचे काम करताना ते गुणवत्तापूर्ण व्हावे यासाठी मक्तेदारावर जबाबदारी करणारे एक परिपत्रक काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी जळगाव यांनी जारी केले आहे. शहरात आता नव्याने तयार केल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या कामाला ते लागू करण्यात यावे. रस्ते किमान पुढील १० वर्ष टिकावे यासाठी आताच कामाच्या निविदेत आवश्यक तो बदल करावा, कामाची गुणवत्ता आणि दर्जा तपासण्यासाठी ‘थर्ड पार्टी’ ऑडिट करावे, रस्त्यांची कामे पूर्ण होण्यापूर्वी त्याठिकाणी पाईपलाईन दुरुस्ती, ड्रेनेज, इतर केबल संदर्भातील कामे पूर्ण झालेली आहेत की नाही याची खात्री मनपा प्रशासनाकडून करवून घेण्यात यावी, जेणेकरून भविष्यात पुन्हा रस्ता खोदकाम करण्याची आवश्यकता भासणार नाही.

जळगाव शहरात एलईडी पथदिवे बसविण्याचा पॅटर्न जसा सर्वत्र लागू झाला तसाच पॅटर्न रस्त्यांच्याबाबत देखील होऊ शकतो. प्लास्टिक वेस्ट मटेरियलपासून रस्ते तयार करण्याची एक संकल्पना अलीकडच्या काळात समोर आली आहे. बंगलोर येथे प्राथमिक स्वरूपात एक रस्ता देखील तयार करण्यात आला आहे. तसेच गेल्याच वर्षी भारतात ७०३ किमी.चे महामार्ग प्लास्टिक वेस्टपासून तयार करण्याच्या कामाला देखील मंजुरी देण्यात आली आहे. जळगाव शहर विकासाच्या टप्प्यावर येऊन ठेपले असून शहरात प्रायोगिक तत्वावर अपघातात एका व्यक्तीने जीव गमावलेला नेरी नका ते कासमवाडीकडे जाणारा २०० मीटर रस्ता प्लास्टिक वेस्टपासून तयार करावा. त्या रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण वाटल्यास संपूर्ण शहरातील रस्ते तयार करताना तो पॅटर्न अवलंबला जाऊ शकतो.

प्लास्टिक वेस्टपासून रस्त्यांचा पॅटर्न यशस्वी झाल्यास तो देशभरात जळगाव पॅटर्न म्हणून ओळखला जाईल. जळगाव मनपा प्रशासन आणि सर्व मनपा सदस्यांनी पुढाकार घेऊन या विषयावर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महापौर जयश्री महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, जळगाव शहरात दररोज जमा होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचे विघटन करून एखाद्या कंपनीमार्फत प्लास्टिक वेस्टद्वारे रस्ता तयार करता येईल का? याबाबत माहिती घेत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

 

 

Protected Content