जळगाव प्रतिनिधी । रस्ते हे रक्त वाहिन्यांप्रमाणेच अतिशय महत्वाचे असतात. याचा दळणवळणाला तर लाभ होतोच पण शेतकर्यांनाही याचा फायदा होत असतो. जिल्ह्याच्या विकासासाठी रस्त्यांचा विकास परिणामकारक असल्यामुळे मतदारसंघातील रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण आणि कॉंक्रिटीकरणाला आपले प्राधान्य असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
रस्ते कामांचा उत्तम दर्जा राखण्यासाठी अधिकारी व ठेकेदार यांच्यात समन्वय महत्वाचा असून कुणी कामात कुचराई केल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील पालकमंत्र्यांनी दिला. तालुक्यातील आसोदा, ममुराबाद, विदगाव आणि नांद्रा या गावांमध्ये विविध विकासकामांचे भूमिपुजन केल्यानंतर आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्र्यांच्या हस्ते परिसरातील तब्बल साडे दहा कोटी रूपयांच्या कामांचा शुभारंभ आज करण्यात आला असून यामुळे परिसरात विकासाचे नवीन पर्व सुरू झाले आहे. तर याच कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकावण्यासाठी सज्ज राहण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन करून कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी यावेळी नमूद केले.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे भूमिपुजन आज करण्यात आले. यानिमित्त आसोदा, ममुराबाद, रिधूर, नांद्रा, विदगाव येथे पालकमंत्र्यांच्या अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि जोरदार घोषणाबाजीत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. सर्व ठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले. यात मुस्लीम महिलांची संख्या देखील लक्षणीय होती. तर आजी – माजी लोकप्रतिनिधींनी त्यांचा सत्कार केला. भूमिपुजनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर अवचित हनुमान मंदिराच्या परिसरात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा : ना. गुलाबराव पाटील
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असावे असे सूचित केले. ठेकेदारांनी रस्त्यांची कामे चांगली करावीत. आपले यावर लक्ष असून कुणी कामात कुचराई केल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला. तर लवकरच विविध कार्यकारी सहकारी संस्था, बाजार समित्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका येत असून यात हातात झेंडा घेणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी या निवडणुका खूप महत्वाच्या आहेत. आपण केलेल्या कामांच्या बळावर सर्वच ठिकाणी शिवसेनेला यश मिळणार असून यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. तसेच आपण निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे प्रतिपादन देखील ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले.
या कामांचे झाले भूमिपुजन
आजच्या कार्यक्रमांमध्ये पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुढील कामांचे भूमिपुजन झाले. राज्य मार्ग क्रमांक ६ वरील आसोदा ते देऊळवाडा दरम्यानच्या रस्त्याचे मजबुतीकरण आणि आसोदा येथील बल्ल्डाची वाट व इंदिरानगर ते कन्याशाळेच्या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण ( २ कोटी) ; आसोदा ते देऊळवाडा दरम्यानच्या रस्त्याची विशेष दुरूस्ती ( १ कोटी २६ लाख रूपये) ; आसोदा ते ममुराबादच्या दरम्यानच्या रस्त्याची सुधारणा ( ३ कोटी ४० लाख ) ; जळगाव ते विदगाव रस्त्याचे डांबरीकरण (२ कोटी ३७ लाख) ; नांद्रा ते भोलाणे दरम्यानच्या रस्त्याचे काम (८६ लक्ष रूपय) आणि अवचित हनुमान फाटा ते मंदिरापर्यंतचे कॉंक्रिटीकरण आणि मंदिर परिसरात सभामंडपाच्या ४२ लाख रूपयांच्या कामाचे भूमिपुजन देखील आज करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, सार्वजनीक बांधकाम खात्याचे सहायक अभियंता श्रेणी-१ सुभाष राऊत, शाखा अभियंता ए.व्ही. सूर्यवंशी, जे.के. महाजन, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, पंचायत समिती सभापती ललीताताई पाटील, युवा सेना जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील, जनाआप्पा कोळी, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष रमेशआप्पा पाटील, पंकज पाटील, मुकेश सोनवणे, तुषार महाजन, अनिल भोळे, किशोर चौधरी, विदगाव सरपंच प्रतिभाताई सपकाळे, डॉ. कमलाकर पाटील, पोलीस निरिक्षक कुंभार, शिवाजी कोळी, जितू पाटील, राजू बेडीस्कर, ठेकेदार सुधाकर कोळी, नानाभाऊ सोनवणे, भरत बोरसे यांच्यासह परिसरातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच शिवसैनिक आणि युवा सैनिकांची उपस्थिती होती.
पालकमंत्र्यांचे कौतुक
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनाआप्पा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र चुव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन सुधाकर कोळी यांनी मानले. याप्रसंगी आपल्या मनोगतातून पंचायत समिती सभापती ललीताताई पाटील यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून होत असणाऱ्या कामांचा ग्रामीण भागातील जनतेला लाभ होणार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे म्हणाले की, आपल्या लहान चिरंजीवांचे लग्न असून देखील ना. गुलाबरावजी पाटील हे जिल्हा व मतदारसंघरूपी कुटुंबाकडे प्राधान्याने लक्ष देत आहेत. त्यांच्या या कामाचे विष्णू भंगाळे यांनी तोंड भरून कौतुक केले.
पालकमंत्र्यांसमोर कुणी माईचा लाल टिकणार नाही !
शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख तथा माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी विरोधकांवर टिकेची झोड उठविली. ना. गुलाबराव पाटील यांनी विकासकामांचा झंझावात सुरू केला असून जळगाव ग्रामीणमधून कुणी माईचा लाल देखील त्यांच्या समोर टिकू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे शेतकरी प्रेम हे बेगडी असल्याचे सांगत त्यांनी शेतकरी मोर्चाचा खरपूस समाचार घेतला. तर खासदारांच्या डोक्यात हवा गेली असून ते पुन्हा निवडून येणार नसल्याचा सांगत त्यांनी निशाणा साधला.