निवडणुकीच्या धामधुमीत राहूल गांधींचे पिकनीक : राजद नेत्याचे टीकास्त्र

पाटणा । बिहार निवडणुकीची धामधुम सुरू असतांना राहूल गांधी हे शिमल्यामध्ये पिकनीक करत असल्याचे नमूद करत यामुळे पक्ष कसा वाढीस लागणार असा प्रश्‍न राजद नेते शिवानंद तिवारी यांनी विचारला आहे. यामुळे बिहारच्या महागठबंधनमधील कुरबुरी समोर आल्याचे दिसून येत आहे.

बिहारमध्ये पुन्हा एकदा महागठबंधनमधील सर्वांत जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसला आहे त्या जागाही राखता आल्या नाहीत. दुसरीकडे आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहार पिंजून काढत सत्ताधार्‍यांना जेरीस आणले. एनडीएला काठावरचे बहुमत मिळाले असले तरी या निवडणुकीत तेजस्वी हे खर्‍या अर्थाने हिरो ठरले आहेत. तर काँग्रेसचे प्रदर्शन मात्र निराशाजनक झाले आहे.

या पार्श्‍वभूमीवर आरजेडी नेते शिवानंद तिवारी यांनी काँग्रेसवर आणि राहुल गांधी यांच्यावर शाब्दीक हल्ला चढवला आहे. शिवानंद तिवारी म्हणाले की, बिहारमधील निवडणूक शिगेला असताना राहुल गांधी बहीण प्रियांका गांधी यांच्यासमवेत शिमल्यात सहल करत होते. पार्टी अशाप्रकारे चालवतात का? काँग्रेस ज्या पद्धतीने निवडणुका लढवत आहे त्याचा फायदा भाजपलाच होत आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ७० जागा लढवल्या होत्या. दुसरीकडे कपिल सिब्बल यांनीही काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. सिब्बल यांना नुकत्याच झालेल्या बिहार निवडणुका आणि इतर राज्यांतील पोटनिवडणुकीतील खराब कामगिरीबद्दल प्रश्‍न विचारले असता ते म्हणाले की, केवळ बिहारच नाही, जेथे पोटनिवडणुका घेण्यात आल्या, त्या ठिकाणी या देशातील लोक काँग्रेसला प्रभावी पर्याय मानत नाहीत हा एक निष्कर्ष आहे. तथापि, बिहारमध्ये पर्यायी आरजेडी होती, आम्ही गुजरातमधील सर्व पोटनिवडणुका गमावल्या.

Protected Content