पाळधी येथे दोन गटात संघर्ष : दुकाने जाळली, परिस्थिती नियंत्रणात

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पाळधी येथे रात्री उशीरा दोन गटांमधील संघर्ष उफाळून आला असून यातून दुकानांची जाळपोळ करण्यात आली. पोलिसांनी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला असून गावातील वातावरण तणावग्रस्त मात्र नियंत्रणात असल्याचे समजते.

या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, काल रात्री नवीन वर्षाच्या स्वागताची सर्वत्र धामधुम सुरू असतांना तालुक्यातील पाळधी येथे मात्र दोन गटांमधील संघर्ष उफाळून आला. रात्री दहानंतर दोन गटांमधील संघर्षाने भीषण रूप धारण केले. यातून गावातील चार दुकानांना आग लावण्यात आली. तसेच फलक आणि वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली.

पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाळधी व धरणगावच्या पोलिसांसह दंगल नियंत्रक पथकाने पाळधी येथील जमावाला पांगवले. तसेच अग्नीशामक दलाच्या बंबांनी दुकानांना लावलेली आग नियंत्रणात आणली. दरम्यान, पोलिसांनी दंगलीच्या संदर्भात तात्काळ कृती करत काही जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे. तर याबाबत रात्री उशीरापर्यंत पाळधी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पाळधी गावात सध्या वातावरण हे पूर्णपणे नियंत्रणात आले. कुणीही समाजमाध्यमांवर या संदर्भात अफवा पसरवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content