वाळू वाहतूकदारांवर महसूल विभागाची कारवाई; दोन ट्रॅक्टर जप्त


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मौजे मूडी शिवारात अनधिकृतपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत वाळूसह दोन्ही ट्रॅक्टर जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी अमळनेर येथील तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. बेटावद येथील मालकांचे हे ट्रॅक्टर असल्याची माहिती मिळाली आहे.

ग्रामस्थांनी दाखवली सतर्कता
ही कारवाई शनिवार, दिनांक २५ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास मौजे मूडी ब्राम्हणे शिवारात करण्यात आली. या भागात काही दिवसांपासून वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती ग्रामस्थ आणि बोदर्डे येथील पोलीस पाटील यांना मिळाली होती. शनिवारी रात्री मूडी ब्राम्हणे, बोदर्डे येथील सतर्क ग्रामस्थांनी वाळू घेऊन जात असलेले दोन ट्रॅक्टर अडवले. अवैध वाळू वाहतूक पकडल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ मारवड पोलिसांना बोलावले. मारवड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ट्रॅक्टर ताब्यात घेतले.

तहसीलदारांच्या पथकाची धाव
पोलिसांनी या घटनेची माहिती लागलीच अमळनेरचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना दिली. तहसीलदारांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच महसूल पथकाला घटनास्थळी पाठवले. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या नेतृत्वाखालील पथकात सुधीर पाटील (ग्राम महसूल अधिकारी, गडखांब) आणि नरेंद्र धनराळे (मंडळ अधिकारी, अमळनेर) यांचा समावेश होता. या पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन दोन्ही ट्रॅक्टर कायदेशीररित्या जप्त केले. गौण खनिजासह (वाळूसह) हे दोन्ही ट्रॅक्टर नियमानुसार अमळनेर येथील तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आले आहेत.

महसूल विभागाने अवैध वाळू वाहतुकीवर कठोर भूमिका घेतली असून, यापुढेही तालुक्यातील गौण खनिज चोरी रोखण्यासाठी अशाच प्रकारची धडक कारवाई सुरू ठेवणार असल्याचे तहसीलदार सुराणा यांनी स्पष्ट केले आहे.