प्रेमभंगाचा सूड : फोटोसोबत अश्लील मजकूर शेअर करून बदनामी !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रेमसंबंधातून बाहेर पडलेल्या एका तरुणाने रागाच्या भरात अत्यंत घृणास्पद कृत्य केले आहे. त्याने त्याच्या पूर्वीच्या प्रेयसीसोबत काढलेले खासगी फोटो अश्लील शिवीगाळ लिहून इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केले. हा धक्कादायक प्रकार ५ एप्रिल रोजी उघडकीस आला असून, याप्रकरणी त्या तरुणाविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका भागात राहणारी पीडित तरुणी शिक्षण घेत आहे. काही वर्षांपूर्वी तिच्या गावी तिचे काका वारल्याने ती कुटुंबासोबत त्यांच्या घरी गेली होती. याच ठिकाणी तिची ओळख तिच्या काकांच्या भाच्यासोबत झाली. दोघांमध्ये फोनवरून नियमित बोलणे सुरू झाले आणि हळूहळू त्यांचे प्रेमसंबंध जुळले. या दरम्यान त्यांनी एकत्र काही फोटोही काढले होते. मात्र, काही काळानंतर तो तरुण दारूच्या नशेत तरुणीवर संशय घेऊन सतत भांडण करू लागला. यामुळे त्रस्त होऊन तरुणीने त्याच्यासोबतचे संबंध तोडले.

प्रेमसंबंध तुटल्याचा राग तरुणाला अनावर झाला आणि त्याने तीन वर्षांपूर्वी रात्रीच्या सुमारास तरुणीसोबतचे काही फोटो त्यांच्या कुटुंबाच्या एका कॉमन व्हॉट्सॲप ग्रुपवर पोस्ट केले होते. त्यावेळी दोन्ही कुटुंबाच्या सदस्यांनी एकत्र बसून समेट घडवला होता. तरुणाने ते फोटो तात्काळ डिलीट केले आणि यापुढे तरुणीसोबत कोणतेही संबंध ठेवणार नाही, अशी हमी दिली होती. त्यामुळे तरुणीच्या कुटुंबीयांनी त्यावेळी पोलिसात तक्रार दाखल केली नव्हती.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी, ५ एप्रिल रोजी तरुणीचे काका आणि मावशी तिच्या घरी आले होते. त्याच रात्री तरुणाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तरुणीसोबतचा एक फोटो पोस्ट केला. धक्कादायक बाब म्हणजे, त्या फोटोवर त्याने अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ लिहिली होती आणि तो फोटो त्याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवला होता. तरुणीच्या काकांनी तात्काळ या घटनेचे स्क्रीनशॉट आपल्या मोबाईलमध्ये काढून घेतले. त्यानंतर सुमारे दोन तासांनी त्या तरुणाने ती स्टोरी डिलीट केली.

पीडित तरुणीचे कुटुंबीय सध्या तिच्या लग्नासाठी योग्य स्थळ शोधत आहेत. याबद्दल त्या तरुणाला माहिती मिळाल्याने त्याने तरुणीचे लग्न मोड व्हावे किंवा तिचे लग्न जमू नये, या द्वेषभावनेतून तिचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. या कृत्यानंतर तरुणीने तात्काळ शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत आपली तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ दखल घेत त्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Protected Content