जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे आणि याचा परिणाम आता आगीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. रविवारी दिवसभरात जळगाव शहर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात तब्बल पाच ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. सुदैवाने, जळगाव मनपाच्या अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत या सर्व आगींवर नियंत्रण मिळवले.
रविवारच्या पहिल्या घटनेत, जळगाव तालुक्यातील असोदा भादली गावाजवळ असलेल्या सोमाणी कॉटन कंपनीत पहाटे साडेपाचच्या सुमारास आग लागली. या कंपनीत कापसापासून धागा तयार केला जातो. धागा निर्मितीच्या प्रक्रियेत मशिनमध्ये जमा होणाऱ्या वेस्ट मटेरियलजवळ असलेल्या एका टॅन्कमध्ये अचानक आग भडकली. मनपाच्या अग्निशमन विभागाला याची माहिती मिळताच अधिकारी शशिकांत बारी यांच्या नेतृत्वाखाली देविदास सुरवाडे, रोहीदास चौधरी, वीजू पाटील, नंदकिशोर खडके, प्रकाश कुमावत, रवी बोरसे आणि निलेश सुर्वे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, या आगीत कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दुसरी घटना पोलीस मुख्यालयातील दक्षता नगरात घडली. येथे असलेल्या शेकडो वर्षे जुन्या वडाच्या झाडाला सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. वडाच्या झाडाच्या पारंब्यांनी लवकरच आगीचा मोठा फैलाव झाला आणि आगीने रौद्र रूप धारण केले. रिजवान तडवी यांनी अग्निशमन विभागाला माहिती दिल्यानंतर पथकाने त्वरित कार्यवाही करत आगीवर नियंत्रण मिळवले. तिसऱ्या घटनेत शहरातील शासकीय आयटीआयच्या बाजूला असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला देखील रविवारी आग लागली होती. यानंतर, दुपारी पावणेचार वाजता एमआयडीसीतील भारत पेट्रोलियमजवळ असलेल्या महावितरणच्या सब स्टेशनमध्ये अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळ गाठून या आगीवरही नियंत्रण मिळवले.
दिवसातील पाचवी आणि शेवटची आग जळगाव तालुक्यातील असोदा रोडवर असलेल्या गॅस गोडावूनच्या मागील बाजूस असलेल्या शेतात लागली. दुपारी साडेतीन वाजता लागलेल्या या आगीत शेतात ठेवलेला जनावरांचा चारा आणि एक झोपडी जळून खाक झाली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. संदीप नारखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली. एकाच दिवसात शहरात पाच ठिकाणी आगीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या तापमानामुळे अशा घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असून, नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन अग्निशमन विभागाने केले आहे.