जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या जळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) चे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी पत्रकार परिषद घेऊन दौऱ्याची माहिती दिली. मंत्री आठवले ८ एप्रिल रोजी जळगावात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून, सामाजिक न्याय विभागाच्या कामांचा आढावा घेणे व पक्ष संघटन मजबूत करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे.
सकाळी ९ वाजता जळगाव येथील समाज कल्याण विभागात सामाजिक न्याय अंतर्गत बैठक होणार आहे. या बैठकीत विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, जनहिताच्या कामांची प्रगती आणि प्रशासनातील अडथळ्यांवर चर्चा होणार आहे. यानंतर सकाळी १० वाजता मंत्री आठवले पत्रकारांशी संवाद साधणार असून, त्यानंतर सकाळी ११ वाजता जळगाव शहरातील लाडवंजारी मंगल कार्यालय येथे जिल्हास्तरीय RPI कार्यकर्ते मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात मंत्री आठवले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन, रणनीती आणि कार्यपद्धतीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. महापालिका, नगरपरिषद, पंचायत समित्या अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे, असे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी सांगितले. या दौऱ्यामुळे जळगाव जिल्ह्यात RPI कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी हा दौरा टर्निंग पॉईंट ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.