धुळे (प्रतिनिधी) संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या जळगाव घरकुल गैरव्यवहाराचा आज निकाल जाहीर होणार होता. परंतू सलग चौथ्यांदा निकाल लांबणीवर पडल्याचे वृत्त आहे.
या संदर्भात अधिक असे की, जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात ४५ कोटी रुपयांचा अपहाराबाबत धुळे जिल्हा कोर्टात निकाल याआधी २१ मे रोजी घोषित होणार होता. परंतू काही संशयित आरोपी गैरहजर असल्यामुळे न्यायाधीश सृष्टी नीलकंठ यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ जूनला ठेवली होती. परंतू कोर्ट सुटीवर असल्यामुळे निकाल घोषित करण्यात आला नव्हता. कोर्ट २२ जून रोजी परत येणार असल्यामुळे घरकुल निकालाची पुढील तारीख आता २७ जून देण्यात आली होती. परंतू दि.२७ जून रोजी देखील कोर्ट सुटीवर असल्यामुळे १५ जुलै रोजी निकाल घोषित होण्याची अपेक्षा होती. परंतू आज देखील निकाल घोषित होऊ शकला नाही. यावेळी निकालाची पुढील तारीख १ ऑगस्ट २०१९ ही देण्यात आली आहे. त्यामुळे आता या तारखेला तरी निकाल लागतो किंवा नाही? याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तर माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक दिग्गजांचा संशयितांमध्ये समावेश आहे. त्यामुळे निकाल काय लागतो? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.