नवी दिल्ली वृत्तसंस्था । एकदिवसीय क्रिकेटमधील जगातील क्रमांक एकचा गोलंदाज जसप्रीत बुमराहचे चार महिन्यानंतर टिम इंडियात पुनरागमन झाले आहे. टिम इंडियाकडून खेळण्याआधी बुमराह एक रणजी स्पर्धेतील सामना खेळणार असला तरी त्याला एका दिवसात फक्त १२ षटके टाकण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पुढील वर्षातील पहिल्या आठवड्यात श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेत तो मैदानात दिसले. बुमराहला सप्टेंबर महिन्यात स्ट्रेस फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याला खेळता आले नव्हते. बुमराह दुखापतीतून बाहेर आल्याने त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान संघासोबत नेटमध्ये सराव केला होता. भारतीय संघासोबत आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याआधी बुमराहला रणजी सामना खेळण्यास सांगण्यात आले आहे. तो सूरतमध्ये केरळ विरुद्धच्या सामन्यात गुजरात संघाकडून सामना खेळणार आहे. भारतीय संघाचे मुख्य निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के प्रसाद हे स्वत: बुमराहच्या सुरत येथील सामना पाहणार आहेत. बुमराह गोलंदाजी करू शकतो. यासंदर्भात भारतीय संघाचे फिजिओ नितीन पटेल यांनी देखील हिरवा कंदील दिला आहे. निवड समितीने बुमराह संदर्भात गुजरात रणजी संघाचा कर्णधार पार्थिव पटेल याला एक महत्त्वाची सूचना दिली आहे. बुमराह गोलंदाजी करेल पण एका दिवसात त्याच्याकडून १२ पेक्षा अधिक षटके टाकून घ्यायची नाहीत, असे पटेलला सांगण्यात आले आहे.