मुंबई (वृत्तसंस्था) छत्रपतींचे वंशज म्हणून आम्ही तुमचा आदर करतो. पण तंगड्या तोडण्याची भाषा योग्य नाही. तंगड्या प्रत्येकाला असतात, अशा शब्दात माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या तंगड्या तोडण्याच्या धमकीला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी आपली भूमिका मांडली. ‘आज के शिवाजी: नरेंद्र मोदी’ पुस्तकाबद्दल भाजपमध्ये असलेल्या शिवरायांच्या वंशजांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राऊत यांनी केली होती. त्यावर पक्षाचे नाव शिवसेना ठेवताना वंशजांना विचारले होते का?, असे उदयनराजे यांनी म्हटले होते. त्याला उत्तर देताना राऊत यांनी उदयनराजेंकडून वंशज असल्याचे पुरावे मागितले होते. त्यावर उदयनराजे यांनी नाव न घेता राऊत यांना इशारा दिला होता. त्यावर ‘छत्रपतींच्या घराण्याबद्दल आम्हाला कायम आदर आहे. या घराण्यातील अनेक लोक शिवसेनेशी जोडलेले होते. तंगड्या तोडण्याची भाषा आम्ही कधीच केली नव्हती. कुणी तशी भाषा करत असेल तर लोकशाहीत ते चालत नाही. तंगड्या प्रत्येकाला असतात. सामान्य नागरिकही तुम्हाला उत्तर देऊ शकतात. लोक पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही प्रश्न विचारतात. १० ते १५ लोक छत्रपतींचे वंशज असू शकत नाहीत. महाराष्ट्रातील ११ कोटी जनता शिवरायांची वंशज आहे,असेही राऊत म्हणाले.