हवे तेच ऐकण्याची पंतप्रधान मोदींची इच्छा – राहुल गांधी

 

नवी दिल्ली –आपल्याला हवे तेच ऐकू आले पाहिजे, आपल्याला जे नको आहे ते आपल्या कानावर पडता कामा नये अशी जरी मोदींची इच्छा असली तरी आता तसे होणार नाही, असे म्हणत राहूल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदींवर टीका केली आहे.

संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर आज कॉंग्रेस संसदीय पक्षाची बैठक झाली. त्यात विविध विषयावर संसदेत व्यापक चर्चा उपस्थित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडताना राहुल गांधी यांनी बेरोजगारी आणि चिनचे आक्रमण या विषयावरून मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्ला चढवला.

राहुल गांधी म्हणाले की, देशापुढील आव्हानांच्या विषयांकडे मोदींनी मिडीयाला हाताशी धरून सतत लोकांचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला असला तरी एका विशिष्ट मर्यादेच्या पलिकडे त्यांना यात यश येणार नाही.आपल्याला हवे तेच ऐकू आले पाहिजे, आपल्याला जे नको आहे ते आपल्या कानावर पडता कामा नये अशी जरी मोदींची इच्छा असली तरी आता तसे होणार नाही.

देशातील वाढती बेरोजगारी, चीनचे भारतावरील आक्रमण आणि देशाच्या आर्थिक स्थितीची झालेली वाताहत हे विषय जोरदार उसळी मारून वर येणारच आहेत. समुद्रातील आईसबर्गला धडकून टायटॅनिक जहाजाची जी अवस्था झाली तशाच स्थितीला सरकारला तोंड द्यावे लागणार आहे.

पक्षाच्या नेतृत्वाबाबत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवणाऱ्या नेत्यांपैकी गुलामनबी आजाद, मनिष तिवारी, आनंद शर्मा हे या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी या बैठकीतील कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. संसद अधिवेशनात राज्यसभा उपसभापतीपदासाठी निवडणूक होणार आहे ती निवडणूक लढण्यासाठी द्रमुक पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

Protected Content