मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील किल्ल्यांचे हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) अशा २५ किल्ल्यांची यादी काढण्यात आली आहे. हे किल्ले करारावर हॉटेल व्यवसायिकांना रिसॉर्ट तसेच हॉटेल उभारण्यासाठी दिले जाऊ शकतात. राज्य सरकारच्या या निर्णयावर गडप्रेमींकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. विरोधकांनीही सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली आहे.
राज्य मंत्रीमंडळाडून ३ सप्टेंबर रोजी नव्या धोरणाला संमती दिली होती. यानुसार एमटीडीसी राज्य सरकारच्या मालकीचे किल्ले करारावर देऊ शकते. या किल्ल्यांवर फक्त हॉटेलच नाही तर विवाहस्थळ आणि मनोरंजन कार्यक्रमांची जागा म्हणूनही विकसित करण्याचा प्रयत्न असेल. गेल्या काही काळापासून राजवाडे आणि किल्ल्यांवरील हॉटेल लग्नासाठी आवडती ठिकाणं झाली आहेत. या निर्णयाचा गडप्रेमी आणि विरोधकांकडून मात्र विरोध होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी, महाराष्ट्रातील गडकोट हे छत्रपती शिवरायांच्या देदिप्यमान इतिहासाच्या पावन स्मृती आहेत. त्यांचे रिसॉर्ट व हेरीटेज हॉटेल्समध्ये रुपांतर करण्याच्या आपल्या सरकारच्या निर्णयाचा आम्ही ठामपणे विरोध करतो. तर मनसे नेते अनिल शिदोरे यांनी महाराष्ट्रातले २५ गड-किल्ले आता हॉटेल्स आणि लग्नसमारंभासाठी तसेच करमणुकीच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय वाचला आणि संताप अनावर झाला. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा दैदिप्यमान इतिहास हा आमचा फार मोठा ठेवा आहे, त्याचा बाजार करू नका, अशी प्रतिक्रिया दिली आहे.