जळगाव प्रतिनिधी | माध्यमिक विभागाच्या अनेक तक्रारी आल्या असून शिक्षण विभागाने लवकर शिक्षकांचे प्रश्न सोडविले नाही तर कार्यालयाबाहेर उपोषणाला बसू, असा इशारा भाजपा शिक्षक आघाडी जळगावचे जिल्हाध्यक्ष प्रवीण जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, “शिक्षण विभागात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. दर महिन्याला लाचलुचपत विभागाच्या कारवाईने कलंकित व्हावे लागत आहे. शिक्षक- शिक्षकेतरांची अडवणूक सुरु आहे. जळगाव वेतन पथकाकडे फरकाची बिल, वैद्यकीय बिल गेल्या वर्षभरापासूनची पडून आहेत. त्यानंतरची बील अदा केली आणि आधीच्या तारखांची देयके आर्थिक पूर्तता न केल्यामुळे पडू दिलेली आहे. शासकीय आदेशानुसार एम.ए. (एज्युकेशन) व आदर्श शिक्षक यांच्या बाबतचे पत्रक अजून विभागाने काढले नाही.
अनेक लोक पी.एच.डी. झाली आहेत. त्यांच्या बद्दल निर्णय नाही. वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी शिक्षण विभागाकडून पात्र शिक्षकांच्या याद्या मागविणे अपेक्षित आहे. त्यांच्याकडे गेल्या अनेक वर्षात लक्ष दिले नाही. पर्यायाने शिक्षकांचे नुकसान होत आहे. महिन्याच्या एक तारखेला पगार कां होत नाही ? वेतन अनुदानाची तरतूद संपूर्ण वर्षभराची केली जावी. कार्यालयीन वेळेवर बाबू गायब असतात. अधिकारी काहीही कारण सांगून गैरहजर असतात. संध्याकाळी मात्र कार्यालयीन वेळ संपल्यावर कागद रंगवतात, बाहेर गावाहून आलेले कर्मचाऱ्यांना खाली हात गावी परतावे लागते. इतर जिल्ह्यात सुद्धा स्थिती वेगळी नाही.
सेवा जेष्ठतेचे स्पष्ट पत्रक काढले जात नाही. त्यामुळे आजही अनेक संस्था – शाळा यांच्या जेष्ठता याद्या सदोष आहेत. त्यामुळे पदोन्नतीमध्ये विभागाला आर्थिक लाभाची अपेक्षा असते. अश्या अनेक प्रकारच्या तक्रारी भाजपा शिक्षक आघाडीकडे माध्यमिक विभागाच्या आल्या असून विभागाने लवकरात लवकर प्रश्न सोडविले नाही तर कार्यालयाबाहेर उपोषणाला बसू, असा इशारा भाजपा शिक्षक आघाडी जळगावचे जिल्हाध्यक्ष प्रवीण जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.