जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी गुरुवार २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कर्मचारी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत मागील गेल्या २२ वर्षांपासून कर्मचारी कंत्राटी पद्धतीने विविध पदांवर काम करत आहे. यात एकूण २ हजार २०० कंत्राटी कर्मचारी क्षयरोग दुरीकरणासाठी जीवाचे रान करून मेहनत घेत आहे. परंतु शासनाच्या वेळोवेळी घेतलेल्या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जात आहे. यामध्ये त्रीसदस्यीय मंत्रिमंडळाच्या गटाने समायोजनाचा घेतलेला स्वतःचाच निर्णय रद्द केला. तसेच वेतन सुसूत्रीकरणांमध्ये जुन्या व नव्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या मानधनात मोठी तफावत आहे. टीबीएचव्ही यांच्या बाबतीत आराखड्यामध्ये मानधन १७ हजार रुपये आहे पण देताना १५ हजार ५०० रुपये दिले जाते. शिवाय कायमस्वरूपी शासकीय कर्मचाऱ्यांना वेळोवेळी ४ ते ५ टक्के महाबत महागाई भत्ता देण्यात येतो. क्षयरोग सारखे अत्यंत संसर्गजन्य कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांना दुचाकी वाहन शासनाने दिले वाहनाचे विमा आहे. वाहनाचा विमा आहे पण कर्मचाऱ्यांचे विमा नाही.
तरी शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित विविध मागण्या मान्य कराव्यात अन्यथा १ ऑक्टोबरपासून राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कर्मचारी संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर किशोर सैंदाणे, नरेंद्र तायडे, किशोर क्षीरसागर, विजय मिस्तरी, किरण निकम, नंदू चौधरी, निलेश भंगाळे, भूषण क्षत्रिय, भगवान चौधरी यांच्यासह आदी कर्मचारी उपस्थित होते.