
अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील वावडे गावाने सहकार क्षेत्रात साधेपणा, एकमत आणि पारदर्शकतेचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे. वावडे येथील मारुती विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून मा. नगरसेविका सौ. गायत्री दिपक पाटील यांच्या नावाचा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठीचा ठराव संचालक मंडळाने एकमताने मंजूर केला. विशेष म्हणजे, या ठरावासाठी आवश्यक असलेल्या झेरॉक्स प्रतींसाठी अवघा दोन रुपयांचा खर्च आला.

कोणताही अनावश्यक खर्च न करता अत्यंत साध्या पद्धतीने हा ठराव मंजूर करण्यात आल्याने वावडे गावासह अमळनेर तालुक्यात या निर्णयाची विशेष चर्चा सुरू झाली आहे. सहकार क्षेत्रातील संस्थांमध्ये अनेकदा होणाऱ्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर केवळ दोन रुपयांत प्रक्रिया पूर्ण झाल्याची बाब लक्षवेधी ठरली आहे. वावडे मारुती विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन तथा सामाजिक कार्यकर्ते दिपक मणिलाल पाटील यांच्या पत्नी सौ. गायत्री दिपक पाटील यांच्या नावाचा हा ठराव संचालक मंडळातील सर्व सदस्यांच्या सहमतीने मंजूर करण्यात आला. संचालक मंडळाने एकमताने घेतलेल्या या निर्णयातून सौ. गायत्री पाटील यांच्या कार्यावर व्यक्त करण्यात आलेला विश्वास अधोरेखित झाला आहे.
यापूर्वी नुकताच दिपक पाटील यांच्या नावाचा शेतकी संघासाठीही ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे सहकार क्षेत्रातील त्यांच्या कार्याची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. दिपक पाटील हे वावडे मारुती विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन म्हणून कार्यरत असून, सहकार क्षेत्रासोबतच सामाजिक कार्य आणि गावाच्या विकासाच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये मागील पंचवार्षिक काळात सौ. गायत्री पाटील यांनी विविध विकासात्मक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवून विविध प्रश्नांवर काम केल्याने त्यांच्या कार्याची दखल घेतली जात असल्याचे या ठरावातून दिसून येत आहे.
संचालक मंडळाने सौ. गायत्री पाटील यांच्या नावाला दिलेली एकमताची पसंती ही नागरिकांमध्येही चर्चेचा विषय ठरत आहे. सहकार क्षेत्रातील संस्थांकडून त्यांच्या कार्याची दखल घेत विश्वास व्यक्त केला जात असल्याने वावडे परिसरात समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, ‘फक्त दोन रुपयांत जिल्हा बँकेसाठी ठराव’ ही बाब अमळनेर तालुक्यासह जिल्ह्यात लक्षवेधी ठरली आहे. अत्यंत कमी खर्चात आणि सर्व संचालकांच्या एकमताने ठराव मंजूर करण्याची ही पद्धत सहकार क्षेत्रातील साधेपणाचे उदाहरण ठरत आहे. या ठरावासाठी सहकार्य करणाऱ्या वावडे मारुती विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सर्व संचालक मंडळाचे तसेच वावडे ग्रामस्थांचे दिपक पाटील व गायत्री पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले. वावडे गावाने घेतलेल्या या निर्णयाची सहकार क्षेत्रात सकारात्मक चर्चा होत आहे.



