भुसावळात ३९ ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर

भुसावळ प्रतिनिधी । ग्रामपंचायत निवडणुकीनंतर तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत आज (दि.२८) सकाळी ११ वाजता पंचायत समिती सभागृहात जाहीर करण्यात आले आहे.

यात ओबीसी ११, सर्वसाधारण १४, अनुसूचित जाती ८ तर अनुसूचित जमाती साठी ६ ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण जाहीर करण्यात आले. यात महिला आणि पुरुष आरक्षण उद्या (ता. २९) जाहीर करण्यात येणार आहे.

तालुक्यात नुकत्यात २६ ग्रामपंचायतींच्या सार्विेत्रक निवडणुका पार पडल्या मात्र नवनियुक्त ग्रा.पं. सदस्यांमधून सरपंचांची निवड होणार आहे. मात्र सरपंच पदाचे आरक्षण जाहीर नसल्यामुळे सरपंच पदावर कोण विराजमान होणार याबाबत स्पष्ट नसल्याने सदस्यांमध्ये आरक्षणाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. तालुक्यातील संपूर्ण ३९ ग्रामपंचायतीमध्ये सन २०११ च्या जनगणनेसुसार अनुसुचित जाती, अनु. जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण या प्रवर्गनिहाय सरपंच पदाच्या आरक्षणाबाबतची सोडत आज (ता. २८)तहसीलदार दीपक धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती मनीषा पाटील, उपसभापती वंदना उन्हाळे, गटविकास अधिकारी विलास भाटकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी तालुक्यातील ग्रामपंचायतींचे पुढीलप्रमाणे आरक्षण काढण्यात आले.

सर्वसाधारण प्रवर्ग (जनरल) : बेलव्हाय, कन्हाळे खुर्द, सुनसगाव, टहाकळी, दर्यापूर, किन्ही, खंडाळे, आचेगाव, बोहर्डी बुद्रूक, खडके, चोरवड, हतनूर, अंजनसोंडे, गोजोरे.

अनुसूचित जाती (एससी) : तळवेल, मोंढाळे, मन्यारखेडा, शिंदी, जाडगाव, कठोरे बुद्रूक, ओझरखेडा, साकरी.

अनुसूचित जमाती (एसटी) : वराडसीम-जोगलखोरी, मांडवे दिगर-भिलमळी, साकेगाव, पिंपळगाव बुद्रूक, विल्हाळे, कंडारी.

नामाप्र(ओबीसी) : पिंप्रीसेकम, सुसरी, वांजोळा, जोगलखेडा, फुलगाव, फेकरी, कठोरा खुर्द, कन्हाळे बुद्रूक, कुर्‍हे प्र.न.,पिंपळगाव खुर्द, काहूरखेडा.

तालुक्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या ग्रा.पं.च्या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर अनेक नवख्यांना या निवडणुकीत संधी मिळाली आहे. मात्र अद्याप सरपंच व महिला आरक्षण जाहीर नसल्यामुळे पदांसाठी इच्छुक असणार्‍यांमध्ये आरक्षणाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर मात्र कोणाची लॉटरी लागते हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. उद्या महिला आणि पुरुष आरक्षण सोडत जाहीर होताच सरपंच पदासाठीच्या हालचालींना वेग येणार आहे.

 

Protected Content