
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपालिकेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत विरोधात काम केल्याचा राग मनात धरून एका तरुणाला सार्वजनिक ठिकाणी मारहाण केल्याची घटना यावल शहरात घडली आहे. या प्रकरणात नगरसेवकासह चार जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत तरुणाच्या डोक्याला दुखापत झाल्याची तक्रार असून, त्याला सोडवण्यासाठी आलेल्या वडिलांना आणि चुलत भावालाही मारहाण करून धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश गोपाळ चौधरी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सागर कुमार सुनील चौधरी, सचिन रविंद्र चौधरी, अभिजीत विलास गुरव आणि प्रशांत अरुण गुरव (सर्व रा. यावल) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, २२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११.१५ वाजता यावल शहरातील चावडी चौकाजवळ सागर कांबळे यांच्या घरासमोरील रस्त्यावर ही घटना घडली. मागील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आपण विरोधात काम केल्याचा राग मनात धरून संशयितांनी आपल्याला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप दिनेश चौधरी यांनी केला आहे. या वेळी सागर सुनील चौधरी याने हातातील कड्याने डोक्यावर मारल्याने दुखापत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार सुरू असताना दिनेश चौधरी यांचे वडील गोपाळ नारायण चौधरी आणि चुलत भाऊ विलास रमेश चौधरी हे त्यांना सोडवण्यासाठी पुढे आले. मात्र, संशयितांनी त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, आमच्या नादी लागल्यास तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी संशयितांनी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. निवडणुकीतील राजकीय मतभेदातून हा प्रकार घडल्याचा आरोप असल्याने यावल शहरात या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासातून या घटनेबाबत पुढील माहिती स्पष्ट होणार आहे.



