जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यातच नाही तर परदेशातही खान्देशी अहिराणी गाण्यांची भुरळ सर्वांनाच घातली आहे. इटलीतील रहिवाशी असलेल्या ॲलीचे डीफ्लोरियां ह्यांनी खान्देशातील अहिराणी गाण्यावर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘व्हाय इज इट इंपॉरटंट टू लीव्ह ट्रेसेस: ॲन एथनोग्राफीक रीसर्च ऑन खान्देशी म्युझिक’ या विषयावर संशोधन करत आहे. ह्याच विषयावर डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महाविद्यालयातील इंग्रजी विभागातर्फे संशोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. गौरी राणे यांनी विद्यार्थीनींना संशोधनासाठी आवश्यक असलेली चिकित्सक वृत्ती आणि नाविन्याचे धाडस अंगी जोपासण्याचे महत्त्व सांगितले. इटलीहून आलेल्या प्रमुख वक्ता कु.ॲलिचे डीफ्लोरीयां संशोधिका, हायडेलबर्ग विद्यापीठ, जर्मनी यांनी त्यांच्या व्याख्यानात भारतीय आणि खान्देशी संस्कृती च्या विविध पैलूंच्या संशोधनात्मक अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. पारंपरिक गाणी, कला यांचे लिखाण आणि योग्य जपणूक एक संशोनात्मक गरज असल्याचे ॲलीचे यांनी नमूद केले. यादरम्यान ॲलीचे यांनी विद्यार्थिनींच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली आणि त्यांच्याशी संवाद साधला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मिताली अहिरे यांनी केले. प्रा. योगिता सोनवणे यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजयादीपा आर. यांनी केले तर प्रा. सविता नंदनवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी इंग्रजी विभागातील प्रा. पूजा टाक व प्रा. नयना पाटील यांनी सहकार्य केले. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.