धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । खान्देशातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा विविध मागण्यांसंदर्भात खान्देश प्रवासी असोसिएशन, धरणगाव आणि ZRUCC सदस्य प्रतीक जैन यांनी पश्चिम रेल्वेचे डीआरएम पंकज सिंग यांना आज धरणगाव येथे निवेदन सादर केले. परिसरातील रेल्वे सुविधांचा अभाव, गाड्यांचे अपुरे थांबे, नवीन मार्गांची गरज आणि सुरक्षा व्यवस्थेची आवश्यकता याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. डीआरएम सिंग यांनी या सर्व मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचे आश्वासन दिल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
धरणगाव रेल्वे स्थानकात अमृत भारत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या कामांची डीआरएम पंकज सिंग यांनी दोन तास पाहणी करून प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतला. आवश्यक कामांच्या गतीमानतेसाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या भेटीदरम्यान खान्देशातील रेल्वे सेवांचा विस्तार आणि सुविधांच्या उन्नतीबाबत विस्तृत चर्चाही झाली.

खान्देश प्रवासी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सादर केलेल्या निवेदनात काही महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या. यात भुसावळ–पुणे किंवा उधना–नंदुरबार–दोंडाईचा–अमळनेर–धरणगाव–जळगाव–मनमाड–दौंडमार्गे पुणे अशी नवीन गाडी सुरू करण्याची मागणी अग्रस्थानी होती. खान्देशचे लोकप्रिय खासदार स्मिताताई वाघ यांनी यापूर्वीही या मागणीबाबत पाठपुरावा केल्याचे नमूद करत, या मार्गामुळे संपूर्ण प्रदेशाला अत्यंत मोठा फायदा होईल, असे प्रवाशांनी सांगितले.
याशिवाय 19005/06 सुरत–भुसावळ एक्सप्रेसचा पूर्वीप्रमाणे वेळेवर धावता होण्यासाठी बदल, ताप्ती–गंगा एक्सप्रेस (19045/46) आणि अहमदाबाद–बोरवणी एक्सप्रेस (19483/84) या गाड्यांना धरणगाव स्थानकावर थांबा मिळावा, अशीही महत्त्वाची मागणी करण्यात आली. भुसावळ–दादर (09051/52) ही गाडी कायमस्वरूपी करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. अमरावती–सुरत (20925/26) एक्सप्रेस दैनंदिन सुरु करावी, अशीही विनंती करण्यात आली.
धरणगाव स्थानकावर RPF आउटपोस्ट निर्माण करणे, तसेच भुसावळ मेमो (19105/06) गाडीला भोणे स्टेशन येथे थांबा देणे या मागण्यांचाही समावेश होता. अमृत भारत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये आवश्यक दुरुस्ती आणि सुविधा वाढवण्यासाठीही विशेष तातडीने लक्ष देण्याची विनंती करण्यात आली.
अध्यक्ष कमलेश तिवारी, उपाध्यक्ष चंद्रकांत भावसार, सचिव श्रेयांस जैन, सहसचिव नंदन पाटील, मार्गदर्शक सदस्य दिनेश पाटील, युवराज रायपूरकर, प्रशांत भाटिया, नारायण महाजन, संभाजी सोनवणे, जतीन नगरिया आणि ZRUCC सदस्य प्रतीक जैन यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले. डीआरएम पंकज सिंग यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे मागण्यांना गती मिळण्याची अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.



