धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घरफोडीत ३३ हजार रुपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ५१ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. याबाबत गुरूवारी १२ मार्च रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निलेश प्रभाकर पाटील (वय ३३, रा. भजे गल्ली, पाळधी, ता. धरणगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. ११ ते १२ मार्च रोजीच्या कालावधीमध्ये त्यांचे घर बंद होते. याची संधी अज्ञात चोरट्यांनी साधून घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी घरातील बेडरूममध्ये असलेल्या लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून त्यातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले. कपाटात ठेवलेली ३३ हजारांची रोकड, १६ हजारांचे कानातले दागिने आणि चांदीचे जोडवे असा एकुण ५१ हजार ३०० रूपयांचा ऐवज लांबविला. १२ मार्च रोजी सकाळी ९ वाजता घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच निलेश पाटील यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संदीप खंडारे हे करीत आहे.



