मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानसंदर्भात पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत आज भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांचा जबाब नोंदवण्यात आला.
एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अड्. गुणरत्न सदावर्ते अनेक वादांच्या भोवऱ्यात आहेत. अड्. गुणरत्न सदावर्ते यांनी २०२० मध्ये एका वृत्तवाहिनीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजासंदर्भात आक्षेपार्ह वक्त्यव्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुण्यासह कोल्हापूर, बीड अन्य ठिकाणी सदावर्ते यांच्याविरोधात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्याप्रकरणी आज अड्.सदावर्तेचा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यात आला आहे.
अड्.गुणरत्न सदावर्ते यांचा काल आणि आज जबाब नोंदवण्यात आला असून हा जबाब ऑन कॅमेरा झाला आहे. तसेच आवाजाचे नमुने देखील तपासासाठी घेण्यात आले असल्याचे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांनी म्हटले आहे.
यावेळी पोलीस ठाण्याबाहेर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी जोरदार घोषणाबाजी केली.कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. जबाब नोंदवल्यावर अड्. गुणरत्न सदावर्ते यांनी प्रसार माध्यमांशी बोलणे टाळत सरळ पोलीस ठाण्यातून बाहेर पडले.