Home Cities जळगाव कुऱ्हा पीएचसीमधील कोविड कक्षाची दुरुस्ती पूर्ण

कुऱ्हा पीएचसीमधील कोविड कक्षाची दुरुस्ती पूर्ण

0
219

 जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, कुऱ्हा येथील दौऱ्यानंतर प्रशासनाची तत्परता पुन्हा एकदा समोर आली आहे. नुकत्याच बांधण्यात आलेल्या कोविड कक्षाच्या छताची दुरवस्था आणि वापर अयोग्य स्थितीबाबत झालेल्या लोकप्रतिनिधींच्या तक्रारींची त्यांनी गांभीर्याने दखल घेतली आणि संबंधित ठेकेदारास तात्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. यानंतर केवळ पाच दिवसांत सदर इमारतीची छत आणि अन्य किरकोळ दुरुस्त्या पूर्ण करण्यात आल्या असून, आता ही इमारत रुग्णसेवेसाठी पुन्हा वापरण्यास तयार झाली आहे.

२० ऑगस्ट २०२५ रोजी सीईओ मीनल करणवाल यांनी कुऱ्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली होती. या भेटीत नव्याने बांधण्यात आलेल्या कोविड कक्षाच्या छताची अत्यंत खराब स्थिती त्यांच्या निदर्शनास आली. ही बाब आरोग्य सेवेसाठी गंभीर अडथळा ठरत असल्यामुळे त्यांनी त्वरित ठेकेदाराला जबाबदार धरत आवश्यक ती कार्यवाही करण्याची ताकीद दिली. त्यांच्या हस्तक्षेपानंतर २५ ऑगस्टपर्यंत छतासह इतर दुरुस्त्या पूर्ण करून इमारतीचा संपूर्ण वापर पुन्हा सुरू करण्यात आला.

सदर इमारतीमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली असून, आता येथे बाह्यरुग्ण तपासणी (OPD) तसेच आंतररुग्ण सेवा (IPD) दोन्ही सुरु होणार आहेत. ही सेवा पुन्हा पूर्ववत सुरू झाल्याने गावातील नागरिक व रुग्णांनी समाधान व्यक्त केले असून, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांचे विशेष आभार मानले आहेत. आरोग्य सुविधा अधिक सक्षम आणि उपलब्ध राहाव्यात यासाठी त्यांच्या त्वरित निर्णयक्षमतेचे गावकऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound