नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | यूपीएससी क्लासेससाठी प्रसिद्ध असणारे अवध ओझा सर यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत दिल्लीत एका कार्यक्रमामध्ये आम आदमी पक्षात प्रवेश केला. यावेळी मनीष सिसोदिया देखील उपस्थित होते. येत्या काही दिवसांत दिल्लीत विधानसभेच्या निवडणुका होणार असून, ते आपच्या तिकिटावर दिल्लीत निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अवध ओझा यांना पक्षात घेतल्याने विधानसभा निवडणुकीत फायदा होईल, अशी आशा आम आदमी पक्षाला आहे. कारण ओझा यांची सोशल मीडियावर आणि तरुणांमध्ये मोठी लोकप्रियता आहे. अनेकवेळा आपण अवध ओझा यांनी आपचे समन्वयक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे कौतुक केल्याचे पाहिले असेल.
अवध ओझा हे देशातील नावाजलेले शिक्षक आहेत. लोक त्यांना अवध ओझा सर या नावानेही ओळखतात. ते यूपीएससी विद्यार्थ्यांना इतिहास विषय शिकवतात. त्यांचा स्वतःचा कोचिंग क्लासही आहे. अवध ओझा हे उत्तर प्रदेशातील गोंडा येथील रहिवासी आहे. त्यांचे पूर्ण नाव अवध प्रताप ओझा आहे. त्यांचा जन्म ३ जुलै १९८४ रोजी झाला असून त्यांच्या वडिलांचे नाव श्रीमाता प्रसाद ओझा आहे. अवध ओझा यांचे वडिल गोंडा येथे पोस्टमास्तर म्हणून काम करायचे. अवध ओझा यांची आई पेशाने वकील आहे. ओझा यांचे प्राथमिक शिक्षण गोंडा येथेच झाले. त्यानंतर त्यांनी गोंडा येथील फातिमा इंटर कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.