अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांच्या प्रचारास प्रारंभ झाला आहे. अमळनेर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल नथ्थू शिंदे यांनी शहरातील व्यापारी पेठेत प्रचार रॅली काढत व्यापारी व व्यावसायिक बांधवांशी संपर्क साधला.
शहरातील भागवत रोड, बस स्थानक, बाजारपेठ, दगडी दरवाजा, आणि भाजी मार्केट या सर्व ठिकाणी व्यापारी बांधव आणि भगिनींशी संवाद साधत, डॉ. शिंदे यांना साथ देण्याचे आवाहन कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या जाचक अटी व जीएसटीला कंटाळलेल्या व्यापारी बांधवांनी यावेळी काँग्रेसच्या पंजाला साथ देणार असल्याचे एकमताने सांगितले. यावेळी शेतीमाल विक्रीला आणलेल्या शेतकऱ्यांनी ही शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी महाविकास आघाडीला मत देणार असे सांगितले.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणे, बेरोजगारीच्या समस्येवर मात करणे, कायदा व सुव्यवस्था सुधारणे, आणि राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाला पूर्णविराम आदी बाबींवर काम करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.