मुंबई प्रतिनिधी । भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी आज (दि.14) पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर जोरदार टीका केली. पण याचवेळी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ‘शिवसेनेने पक्षाचं नाव ठेवताना वंशजांची परवानगी घेतली होती का? शिवसेनेने ‘शिव’ काढून ‘ठाकरेसेना’ असे नाव ठेवावं.’ असे म्हणत उदयनराजे यांनी शिवसेनेवर पलटवार केला.
याचवेळी उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर देखील टीका केली, ‘अलीकडच्या काळात जाणता राजा अशी उपमा काही जणांना देतात, जाणता राजा फक्त शिवाजी महाराज… त्यामुळे इतर कुणाला जाणता राजा म्हटले जाते त्याचा मी निषेध करतो.’ असे म्हणत उदयनराजेंनी पवारांवर निशाणा साधला.
‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी यावर बोलावे असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला उत्तर देताना उदयनराजे यांनी शिवसेनेचे महाराजांवरील प्रेम बेगडी असल्याचे दाखले दिले. जेव्हा सोईचे असेल, तेव्हा महाराजांचेन नाव घ्यायचे आणि सोईचे नसेल तेव्हा ते काढून टाकायचे ही शिवसेनेची नीती असल्याचे उदयनराजे म्हणाले. या वेळी उदयराजे यांनी या वादग्रस्त पुस्तकाचाही निषेध केला.