जळगाव, प्रतिनिधी । काँग्रेस पक्षाशी गद्दारी करून इतर पक्षाची उमेदवारी करणाऱ्या डॉ. राधेश्याम चौधरी यांची काँग्रेस पक्षातून हाकलपट्टी करावी, अशी मागणी शहर युवक काँग्रेस सरचिटणीस सुरेंद्र उल्हास कोल्हे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.
जळगाव शहर विधानसभा निवडणुकीसाठी नुकतेच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. २०१४ च्या आधी शहर विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाकडे होती. परंतु वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या चाचपणी केल्यानंतर काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसल्यामुळे सर्वानुमते ही जागा राष्ट्रवादीकडे देण्यात आली. या निवडणुकीसाठी शहर काँग्रेसचे महानगराध्यक्ष चौधरी हे इच्छुक होते. ते स्वतः फक्त स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी पक्षाकडे उमेदवारी मागत होते. इच्छुक असूनही त्यांनी काँग्रेसच्या नावाने एकही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही व पक्षानेही ही जागा राष्ट्रवादीला दिल्यामुळे हा राग मनात डॉ.चौधरी यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत समाजवादी पक्षाच्या वतीने उमेदवारी दाखल केली.
डॉ. चौधरी यांना काँग्रेस पक्षात असतांना कमी वेळात २०१३ साली नगरसेवक पदासाठी उमेदवारी, त्यानंतर कार्याध्यक्षपद व २०१४ साली विधानसभा उमेदवारी आणि त्यानंतर महानगराध्यक्षपद इतके पदे देवूनही त्यांनी पक्षाशी गद्दारी करून दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी दाखल केली. म्हणून शहर काँग्रेसच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करून त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी शहर युवक काँग्रेस सरचिटणीस सुरेंद्र उल्हास कोल्हे यांनी केली आहे.