खासगी रुग्णालयातील कोरोनाबाधितांना दिलासा; रेमडेसिवीर मिळणार २३६० रुपयात

मुंबई प्रतिनिधी । खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना कोरोनावर प्रभावी असणारं रेमडेसिवीर इंजेक्शन अल्प दरात मिळावं म्हणू राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या इंजेक्शनचे दर सरकारने निश्चित केले असून आता हे इंजेक्शन अवघ्या २३६० रुपयांत कोरोनाबाधितांना मिळणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक औषध केंद्रही निश्चित करण्यात आलं आहे.

राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये हे औषध मोफत उपलब्ध आहे. परंतु खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना हे औषध मिळत नसल्याच्या अथवा महाग मिळत असल्याच्या तक्रारी राज्यात मोठ्या प्रमाणावर येत असून त्याची दखल घेऊन शासनाने हा निर्णय घेतला. त्यामुळे खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना निश्चित केलेल्या दरात रेमडेसीविर उपलब्ध होण्याकरीता अन्न व औषध प्रशासनामार्फत प्रत्येक जिल्ह्यातील खाजगी औषधी केंद्रे निश्चित केली आहेत. राज्यामध्ये ५९ औषध केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये अमरावती विभागात ५, कोकण विभागात १०, नागपूर विभागात ६, औरंगाबाद विभागात ११, नाशिक विभागात ९, बृहन्मुंबई विभागात ५ आणि पुणे विभागात १३ औषध विक्रेते निश्चित करण्यात आले आहेत.

इंजेक्शनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णालयाने त्याबाबत प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे. त्यासोबत प्रिस्क्रिप्शन, रुग्णाचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट, आधार कार्ड किंवा छायाचित्र असलेले परवाना अथवा प्रमाणपत्र तसेच रुग्णाची वैद्यकीय माहिती कळविणे आवश्यक आहे.

Protected Content